कामगारांना मिळणार दोन महिन्यांचे वेतन व साखर
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंद पाटील यांनी किसन वीर व खंडाळा साखर कारखान्याच्या सभासदांना साखर देऊन दिवाळी गोड केलेली होती. त्याचधर्तीवर किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या कामगारांचीही दिवाळी गोड केलेली असुन त्यांना दोन महिन्याचे वेतन तसेच ५ किलो साखर देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांची साखर वाटप गेली सात ते आठ वर्ष बंद होती. त्याची सुरूवात नामदार मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील व संचालक मंडळाने शेतकऱ्यांना सुखद आनंदाचा धक्का दिलेला होता. शेतकरी व कामगार ही दोन्ही कारखान्याची चाके असल्यामुळे कामगारांनाही दिवाळीनिमित्त दोन महिन्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यावर आज वर्ग केलेले असुन त्यांनाही ५ किलो साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू असुन संचालक मंडळाने गाळपाचे जे उद्दीष्ठ डोळ्यासमोर ठेवलेले आहे, त्यादृष्टीने वाटचाल सुरू असुन कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनीही आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केलेले असुन नामदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील व संचालक मंडळाच्यावतीने सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











