वाईच्या भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ! कालवड अन् रेडकू ठार - पिंजरा लावण्यासाठी माणसाच्या जीवाची प्रतीक्षा

वनविभागाच्या भूमिकेवर नागरिकांचा संताप; विनायक नगर,रविवार   परिसरात भीतीचे वातावरण
Leopard's Rampage, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई शहरातील विनायक नगर, रविवार पेठ येथे भरवस्तीत बिबट्याने शिरकाव करत घराच्या पडवीतील लहान कालवड आणि रेडकू यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री अंदाजे दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली असता, मनुष्यावर हल्ला झाल्याशिवाय पिंजरा लावता येणार नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी आणखी एखाद्या जीवितहानीची प्रतीक्षा करायची का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

उसाच्या, मक्याच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे

विनायक नगर येथील अमोल अनिल बोडके यांच्या घराबाहेरील पडवीत बांधलेल्या लहान कालवडीसह रेडकूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही जनावरांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक पाहणीत जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केला असून दोन्ही जनावरांचे शवविच्छेदनही करण्यात आले आहे.
दरम्यान, वनविभागाच्या पथकाने परिसरात बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता जवळील उसाच्या आणि मक्याच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. त्यामुळे बिबट्या परिसरातच दबा धरून असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पिंजरा लावण्याच्या मागणीवरून वादाची ठिणगी

या घटनेमुळे अमोल बोडके यांचे नुकसान झाले असून त्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी संबंधित ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
 मात्र,‌नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मनुष्यावर हल्ला झाल्याशिवाय पिंजरा लावता येणार नसल्याचे उत्तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या कथित भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भरवस्तीत बिबट्या येऊन पाळीव जनावरांवर हल्ला करत असेल, तर मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग एखाद्या व्यक्तीवर हल्ला होण्याची वाट पाहिल्यानंतरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या हालचालींची चिंता

दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न लक्षात घेता वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, या विशिष्ट घटनेमागे पाणीटंचाई किंवा दुष्काळ हेच कारण असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही, मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

भरवस्तीत घडलेल्या या घटनेनंतर वनविभागाने परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर एकटे फिरणे टाळावे, लहान मुले व पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, अशी खबरदारी नागरिकांनी घ्यावी.
आता वनविभाग या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणार का आणि नागरिकांच्या मागणीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
      -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !