खावली येथे पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी; पंचनाम्यांत एकही बाधित खातेदार वंचित राहू नये, संयुक्त पथकाला कडक सूचना
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून, शासनाच्या दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निर्णयानुसार तालुक्याचा Trigger-2 मध्ये समावेश झाल्यानंतर प्रशासनाने पीक नुकसानीच्या पाहणीला गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी खावली येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. पंचनाम्यांमध्ये नुकसानग्रस्त एकही खातेदार वंचित राहू नये, अशा स्पष्ट सूचना संयुक्त पथकाला देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या लहरीपणामुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे वाई तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः वाई तालुक्याच्या पश्चिम भागासह विविध गावांमध्ये भात पिकाला मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी पिके करपल्याचे चित्र आहे.
कार्यालयाबाहेर पडून बांधावर पाहणी
शासन निर्णयानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. तहसीलदारांनी खावली येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. शेतातील नुकसानीची वस्तुस्थिती समजून घेत पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता या पाहणीचे प्रतिबिंब पंचनाम्यांत किती अचूकपणे उमटते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
एकही बाधित खातेदार सुटता कामा नये!
पीक नुकसान आणि दुष्काळासंदर्भातील पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश संयुक्त पथकाला देण्यात आले आहेत. नुकसान झालेला एकही बाधित खातेदार पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, अशी कडक भूमिका तहसीलदारांनी घेतली आहे.
पंचनामे करताना प्रत्यक्ष नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करणे, पात्र शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी करणे आणि तांत्रिक किंवा कागदोपत्री त्रुटींमुळे कोणाचेही नुकसान होऊ न देणे, ही प्रशासनासमोरील महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक होणे आवश्यक आहे.
मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
वाई तालुक्याचा Trigger-2 मध्ये समावेश झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, केवळ यादीत समावेश होणे किंवा पंचनामे सुरू होणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष नुकसानीचे योग्य मूल्यमापन होऊन पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळणे महत्त्वाचे आहे.
प्रशासनाने दाखवलेली तत्परता पंचनामे पूर्ण होईपर्यंत आणि मदतीची प्रक्रिया पुढे जाईपर्यंत कायम राहणार का, हा खरा प्रश्न आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक बाधित शेतापर्यंत पोहोचून वस्तुस्थितीची नोंद करावी, अशी अपेक्षा वाई तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











