नातेपुते पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
नातेपुते - सायबर गुन्हेगारी ही आता केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित समस्या राहिलेली नसून, नागरिकांनी सतर्क व जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन सोलापूर ग्रामीणच्या नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी केले आहे.
नागरिकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार लोकांचा निष्काळजीपणा, लालसा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन विविध क्लृप्त्यांद्वारे फसवणूक करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक फसवणूक, अश्लील चॅटिंगद्वारे ब्लॅकमेलिंग, 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवणे, टेलिग्राम चॅट्स बनावट शेअर मार्केट ग्रुप्स अशा विविध माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे.
नागरिकांना महत्त्वाचा सल्ला व मार्गदर्शक सूचना
अनोळखी कॉल्स व लिंक्स: कोणत्याही अनधिकृत फोन कॉल्सवर, संशयास्पद लिंक्सवर अथवा अनोळखी 'एपीके' (APK) फाइल्सवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि त्या डाउनलोड करू नका.
धमक्यांना घाबरू नका: सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंग किंवा धमक्यांना घाबरून जाऊ नका.
तातडीने तक्रार नोंदवा: कोणतीही सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता त्वरित १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी.
शेवटी, "सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपली जागरूकता हीच आपली पहिली सुरक्षा आहे," असा मोलाचा संदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी नागरिकांना दिला आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











