जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर धक्कातंत्र - भाजप-शिंदेसेना समीकरणांवर परिणामाची चर्चा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
माण-खटावच्या राजकारणातील वजनदार नाव आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सख्खे बंधू असलेल्या शेखर गोरे यांच्या या निर्णयामुळे माण-खटावसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या विजयामागे शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक मानली गेली होती. त्यानंतर दोन्ही बंधूंच्या राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क सुरू होते. अखेर शेखर गोरे यांनी भाजपऐवजी शिंदे यांच्या शिवसेनेची वाट निवडल्याने हा प्रवेश केवळ पक्षबदल न राहता माण-खटावच्या आगामी राजकीय गणिताचा केंद्रबिंदू ठरला आहे.
बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेशाला विशेष महत्त्व
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तोंडावर असताना झालेल्या या प्रवेशाला अनन्यसाधारण राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणातील शेखर गोरे यांचे वजन आणि माण-खटावमधील त्यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता, त्यांच्या नव्या भूमिकेचा निवडणुकीतील समीकरणांवर कितपत परिणाम होतो, याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिंदे शिवसेनेसाठीही हा प्रवेश संघटनात्मकदृष्ट्या मोठा मानला जात आहे. माण तालुक्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शेखर गोरे यांच्या स्थानिक नेटवर्कचा थेट फायदा होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सहकार क्षेत्रातील वर्चस्वाच्या लढाईत शिंदे सेना जिल्ह्यात पाय रोवण्याच्या प्रयत्नात असताना, गोरेंच्या रूपाने पक्षाला चर्चेतील आणि वजनदार चेहरा मिळाला आहे.
महायुतीतील घटक पक्षांतच स्पर्धा
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) हे महायुतीचे घटक असले, तरी स्थानिक पातळीवर वर्चस्वाची स्पर्धा कायम आहे. त्यामुळे शेखर गोरेंच्या प्रवेशाचा परिणाम केवळ माण-खटावपुरता मर्यादित राहतो की जिल्हा बँकेच्या राजकारणातील व्यापक समीकरणे बदलतो, हे आगामी घडामोडींवरूनच स्पष्ट होणार आहे.
दोन बंधू, दोन पक्ष - जिल्ह्याचे लक्ष
सध्या ना. जयकुमार गोरे भाजपमध्ये, तर शेखर गोरे शिवसेनेत अशी दोन्ही बंधूंची वाटचाल वेगवेगळ्या पक्षांतून सुरू आहे. त्यामुळे आगामी जिल्हा बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही राजकीय प्रवाहांचा एकमेकांवर काय परिणाम होतो, याकडे सातारा जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











