ईपीएस ९५ पेन्शनधारकांचा केंद्र सरकारविरोधात एल्गार, २८ नोव्हेंबरला पंढरपुरात जिल्हास्तरीय मेळावा!

किमान ९ हजार पेन्शन आणि महागाई भत्त्यासह मोफत वैद्यकीय सुविधेची मागणी, १६ नोव्हेंबर काळा दिवस पाळणार
Gathering of EPS-95 Pensioners, pandharpur, solapur, maharashtra, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
केंद्र सरकारच्या ईपीएस १९९५ (EPS 95) पेन्शन योजनेअंतर्गत देशातील सुमारे ८१ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजी पेन्शन मिळत असून, वाढत्या महागाईच्या काळात वृद्धापकाळी उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अन्यायाविरोधात 'निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समिती' (राष्ट्रीय संघटन, सोलापूर विभाग) च्या वतीने येत्या २८ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे सोलापूर जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा सचिव इंजि. शंतकांत ठोकळे व जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ नरखेडकर यांनी दिली आहे.

तुटपुंज्या पेन्शनमुळे वयोवृद्धांची हेळसांड
१६ नोव्हेंबर १९९५ रोजी केंद्र सरकारने ईपीएस (१९९५) ही पेन्शन योजना अमलात आणली. या योजनेत वीज मंडळ, एस.टी. महामंडळ, साखर कारखाने, सूत गिरण्या, कापड गिरण्या, खाजगी बँका, विडी कामगार व टेक्स्टाईल्स अशा तब्बल १८७ उद्योगधंद्यांमधील कामगारांचा समावेश आहे. मात्र, या निवृत्तांना दरमहा अवघी १००० ते ३००० रुपये इतकीच तुटपुंजी पेन्शन दिली जाते. विशेष म्हणजे, या पेन्शनला कोणताही महागाई भत्ता लागू नाही.

कामगारांच्या नोकरी काळात त्यांच्या वेतनातून वसूल केलेली रक्कम जर बँक किंवा पोस्टात जमा केली असती, तरीही त्यांना दरमहा किमान ७ हजार रुपये व्याज किंवा पेन्शन मिळाली असती, असे मत निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

कोशियारी समितीच्या अहवालाची पायमल्ली
गेल्या १५ वर्षांपासून हा लढा सुरू असून, २०१२ मध्ये तत्कालीन सरकारने भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने अहवाल क्र. १४७ द्वारे पेन्शनधारकांना दरमहा ३००० रुपये + महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची शिफारस केली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी सत्ता आल्यास ९० दिवसांत या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

आंदोलनाची पुढील दिशा आणि तीव्र लढा
नुकत्याच चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पुढील आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे:
१५ डिसेंबर २०२६: मुख्य आयुक्त, ईपीएफओ (EPFO) यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
१६ डिसेंबर २०२६: दिल्लीतील जंतरमंतर येथे तीव्र आंदोलन.
१६ नोव्हेंबर २०२६: पेन्शन योजना लागू झालेल्या दिवशी देशभरात 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे.
ईपीएफओकडे सध्या सुमारे १० लाख कोटी रुपयांची रक्कम शिल्लक असून, ६० हजार कोटी रुपयांची अनक्लेम्ड (Unclaimed) रक्कम पडून आहे. या रकमेच्या व्याजातूनही पेन्शनवाढ सहज शक्य असताना केंद्र सरकार उदासीनता दाखवत असल्याचा सूर कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे.

संघटनेच्या प्रमुख ४ मागण्या:
दरमहा किमान ९,००० रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता लागू करावा.
निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी.
विधवांना १००% पेन्शन लागू करावी.
ईपीएस पेन्शन योजनेला कायदेशीर संरक्षण/कायदा लागू करावा.

पंढरपुरातील मेळाव्यास लोकप्रतिनिधींची उपस्थिती
बुधवार, २८ नोव्हेंबर रोजी पंढरपूरच्या पावन भूमीत आयोजित सोलापूर जिल्हास्तरीय मेळाव्यात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय विधी सल्लागार मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय एस.टी. कामगार संघटनेचे पदाधिकारी, वीज मंडळाच्या राज्य संयुक्त सचिव फेडरेशनचे पदाधिकारी, राष्ट्रीय कामगार सेल आणि पंढरपूरचे आमदार मा. अभिजित पाटील हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हरिभाऊ नरखेडकर, दिलावर मणेरी, अशोक कोडगुळे, बाळासाहेब पाटील, शिवाजीराव दळवी आणि शंतकांत ठोकळे यांनी केले आहे.

-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !