दिवाळीसाठी किसन वीर च्या सभासद, बिगर सभासदांना मिळणार साखर
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - किसन वीर साखर कारखान्याच्या बॉयलर अग्रि प्रदिपन समारंभात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंद पाटील यांनी शेतकऱ्या lना दिलेल्या शब्दानुसार मंगळवार दि.२७ पासुन किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांना साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. नामदार मकरंदआबांनी कारखान्याकडुन जवळपास ८ वर्षांपासन बंद पडलेली साखर वाटपाची सुरूवात करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असल्याचे व्हार्ईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांना अनुक्रमे ज्या सभासदांचा ऊस आलेला आहे त्यांना १० किलो व ज्यांचा ऊस आलेला नाही अशा सभासदांना ५ किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या बिगर सभासदांचा ऊस गळितासाठी आलेला आहे, त्यांना ५ किलो साखर मिळणार आहे.
या साखरेचा दर २० रूपये प्रतिकिलो राहणार आहे. साखर घेण्यासाठी येताना सभासदांनी कारखान्याने दिलेले स्मार्टकार्ड किंवा आधारकार्ड व त्याची झेरॉक्स आणणे गरजेचे आहे, त्याशिवाय साखर मिळणार नाही, असेही सांगण्यात आलेले आहे. साखर वाटपाची वेळ सकाळी ९ पासन सायंकाळी ४ वाजेपर्यत संबंधित गट ऑफिसला करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या गट ऑफिस किंवा शेती कर्मचाऱ्यांशी संपर्क साधुन आपली साखर कोणत्या ठिकाणी वितरीत केली जाणार आहे, याची माहिती घ्यावी.
सभासदांना साखर घेण्यासाठी त्रास होणार नाही, याची काळजी व्यवस्थापनाने घेतलेली असुन आपल्या जवळच्या ठिकाणीच साखर वाटपाचे नियोजन केले असल्याचे सांगितले. बंद पडलेले साखर वाटप पुन्हा सुरू होत असल्याचे पाहुन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत. किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्याला घालून सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी श्री. शिंदे यांनी केले असुन नामदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील व व्यवस्थापनाच्यावतीने सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











