वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी एवढी टोलवाटोलवी का? - ग्रामस्थांचा संतप्त सवाल
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (वैभव कुलकर्णी)
स्मार्ट तंत्रज्ञानाच्या गप्पा मोठ्या; पण शिंदेवाडीतील वीजपुरवठा मात्र अजूनही अंधारात! माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सिंगल फेज वीजपुरवठ्याचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. दिवस असो वा रात्र, तासनतास वीज गायब होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, महावितरणच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
एकीकडे वीजबिल थकले की ग्राहकावर तातडीने कारवाई करण्यासाठी यंत्रणा सज्ज असते; मात्र ग्राहकांना सुरळीत वीज देण्याची वेळ आली की कारणांची यादी आणि आश्वासनांची सरबत्ती! या विरोधाभासामुळे ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘वसुली हायटेक, सुविधा मात्र कुठे?’
महावितरणच्या डिजिटल आणि स्मार्ट कारभाराचा मोठा गवगवा केला जातो. ऑनलाइन बिल भरणा, डिजिटल सेवा आणि तातडीची वसुली यासाठी आधुनिक यंत्रणा उभारली जात आहे. मात्र शिंदेवाडीसारख्या ग्रामीण भागात मूलभूत आणि अखंडित वीजपुरवठ्याचीच हमी मिळत नसेल, तर या स्मार्ट कारभाराचा फायदा नेमका कोणाला? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
“बिल भरण्यात एक दिवस उशीर झाला तरी ग्राहकाचा वीजपुरवठा बंद करण्याची तत्परता दाखवली जाते; मग ग्राहकांना तासन्तास अंधारात ठेवताना हीच तत्परता कुठे जाते?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
रात्री गाव काळोखात; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सततच्या वीजखंडिततेमुळे रात्रीच्या वेळी शिंदेवाडी परिसर अक्षरशः काळोखात बुडत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणेही धोकादायक बनले असून, चोरी आणि अनुचित प्रकारांची भीती नागरिकांना सतावत आहे. गावाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला असताना महावितरणकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. उकाडा आणि डासांचा वाढता उपद्रव यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रात्री वीज नसल्याने अनेक कुटुंबांची झोप उडाली आहे.
विद्यार्थ्यांचा अभ्यास अंधारात; व्यवसायांनाही फटका
वीजपुरवठ्याच्या या अनिश्चिततेचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. परीक्षांच्या काळात अभ्यासासाठी वीज उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पिठाच्या गिरण्या, दुग्ध व्यवसाय तसेच इतर छोटे व्यावसायिकही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झाले आहेत. वीज असेल की व्यवसाय, वीज नसेल की नुकसान, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची व्यथा व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
‘वालचंदनगरहून सप्लाय बंद’, ‘मेन लाईनमध्ये बिघाड’... उत्तरांची जुनीच टेप!
शिंदेवाडीतील वीजपुरवठ्याबाबत नातेपुते महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, ‘वालचंदनगरहून सप्लाय बंद आहे’, ‘मेन लाईनमध्ये बिघाड आहे’ अशी कारणे सांगितली जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. मात्र, बिघाड वारंवार होतोय तर त्याचे मूळ कारण शोधणार कोण? तात्पुरती दुरुस्ती करून पुन्हा तोच प्रकार सुरू होत असेल, तर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? असा सवाल आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
फीडरपासून ट्रान्सफॉर्मरपर्यंत ‘ऑडिट’ करण्याची मागणीशिंदेवाडीचा वीजप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी केवळ तोंडी आश्वासन न देता प्रत्यक्ष तांत्रिक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. त्यासाठीवालचंदनगर ते शिंदेवाडी मुख्य वीजवाहिनीचे तातडीने पेट्रोलिंग व तांत्रिक ऑडिट करावे.जीर्ण तारा, इन्सुलेटर आणि इतर खराब साहित्य तातडीने बदलावे.वाढत्या वीजभाराचा विचार करून ओव्हरलोड होणाऱ्या रोहित्रांची क्षमता वाढवावी.गरज असल्यास नवीन ट्रान्सफॉर्मर उभारावा.वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी.सैल जंपर, जळालेल्या केबल्स आणि अर्थिंगची तातडीने दुरुस्ती करावी.रात्रीच्या बिघाडासाठी स्वतंत्र तांत्रिक पथक उपलब्ध करून द्यावे.मुख्य वाहिनी बंद पडल्यास पर्यायी लिंकद्वारे वीजपुरवठा सुरू ठेवण्याची व्यवस्था करावी.आता ‘आश्वासन’ नको; शिंदेवाडीला कायमचा वीजपुरवठा हवा!
महावितरणची वितरण यंत्रणा उभारणे, चालवणे आणि तिची देखभाल करणे हे कंपनीच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी आहे. त्यामुळे शिंदेवाडीतील वारंवारच्या बिघाडांकडे केवळ स्थानिक पातळीवरील किरकोळ तक्रार म्हणून न पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. “आता फोनवरची कारणे आणि तात्पुरती दुरुस्ती नको. फीडर, मेन लाईन, ट्रान्सफॉर्मर आणि संपूर्ण यंत्रणेची तपासणी करून कायमस्वरूपी तोडगा काढा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नातेपुते कार्यालयावर धडक मोर्चाचा इशारा
शिंदेवाडीतील वीजपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास संतप्त ग्रामस्थ व शेतकरी नातेपुते महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.
वीजबिल वसुलीत ‘स्मार्ट’ आणि वीजपुरवठ्यात ‘सुस्त’ असा कारभार किती दिवस चालणार? आता या प्रश्नाचे उत्तर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच द्यावे, अशी संतप्त भावना शिंदेवाडी परिसरात व्यक्त होत आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























