शिवतीर्थ येथे जोरदार घोषणाबाजी; वाई-महाबळेश्वर मार्ग तब्बल तासभर रोखला
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून त्यांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत असून, विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच प्रत्यय आज वाई तालुक्यातही आला.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वाई तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटला. वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, समन्वयक तसेच मराठा सेवक सकाळी ११ वाजता वाई येथील शिवतीर्थ येथे जमले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
त्यानंतर आंदोलकांनी वाई-महाबळेश्वर मार्ग तब्बल एक तास रोखून धरला. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे एक तास रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळातच त्यांना सोडून देण्यात आले.
दरम्यान, आंतरवाली सराटी येथेही आंदोलकांची मोठी गर्दी जमली असून आंदोलनाचे वातावरण अधिक तीव्र होत आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर शासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो आणि या आंदोलनावर सकारात्मक तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























