भारत-बेल्जियम भागीदारीमुळे जागतिक व्यापाराला नवी दिशा मिळणार - बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांचे प्रतिपादन

बेल्जियमच्या उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
India-Belgium Trade Partnership, Belgian Prime Minister Bart De Wever, cm devendra fadanvis, maharashtra, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मुंबई (माहिती व प्रसारण मंत्रालय )
भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा केवळ शुल्क, नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नसून विश्वासावर आधारित व्यापक भागीदारीचा करार आहे. या कराराच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधींचे आर्थिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून, भारत-युरोपियन युनियन आर्थिक भागीदारीच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि बेल्जियम यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक व्यापक करण्यासाठी ‘मुंबई-अँटवर्प’ आर्थिक भागीदारी विकसित करण्याची संकल्पनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडली.

भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर आयोजित भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यावेळी उपस्थित होते. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे देखील यावेळी उपस्थित होते. अँटवर्प-ब्रुज बंदर, बेल्जियमच्या प्रधानमंत्री कार्यालयाचे चॅन्सेलरी, एफपीएस फॉरेन अफेअर्स, फ्लँडर्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेड आणि मुंबईतील बेल्जियमचे कॉन्सुलेट जनरल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये भारताशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या युरोपीय देशांपैकी बेल्जियम एक आहे. लोकशाही, संघराज्य व्यवस्था, बहुविधता आणि कायद्याचे राज्य या समान मूल्यांवर भारत-बेल्जियम मैत्रीची भक्कम पायाभरणी झाली आहे. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे या संबंधांना नवी दिशा मिळणार आहे. जगात भू-राजकीय अनिश्चितता वाढत असताना भारत आणि युरोप विश्वासार्ह व सक्षम पुरवठा साखळ्यांसाठी परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारत आहेत.

महाराष्ट्र-बेल्जियम नैसर्गिक भागीदार
बेल्जियमकडे जागतिक दर्जाची बंदरे आणि लॉजिस्टिक्स व्यवस्था असून औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, रसायने, यंत्रसामग्री, प्रगत उत्पादन, सेमीकंडक्टर संशोधन, हरित हायड्रोजन आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राकडे मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि मजबूत औद्योगिक परिसंस्था आहे. त्यामुळे बेल्जियम आणि महाराष्ट्र हे नैसर्गिक भागीदार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात सुमारे १५ टक्के आणि निर्यातीतही जवळपास तेवढाच वाटा आहे. भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास एक तृतीयांश गुंतवणूक महाराष्ट्रात होते. देशातील सुमारे ६६ टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजन राजधानी असून पुणे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, तंत्रज्ञान आणि संशोधनाचे प्रमुख केंद्र आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह डेटा सेंटर, नवोन्मेष, आरोग्य आणि शिक्षणाचे नवे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. २०३० पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट असून या प्रवासात बेल्जियमने भागीदार व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

पाच क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या व्यापक संधी
बेल्जियम-महाराष्ट्र सहकार्यासाठी प्रगत उत्पादन आणि हरित उद्योग, सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक्स, स्वच्छ ऊर्जा, औषधनिर्माण व जैवतंत्रज्ञान तसेच बंदरे, लॉजिस्टिक्स आणि दळणवळण या पाच क्षेत्रांत मोठ्या संधी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
हरित लोह व पोलाद तंत्रज्ञान सहकार्य हे युरोपीय तंत्रज्ञान, भारताची उत्पादन क्षमता आणि महाराष्ट्राची औद्योगिक परिसंस्था यांचा उत्तम समन्वय आहे. याच धर्तीवर आणखी भागीदारी विकसित करण्यात येईल. बेल्जियमच्या ‘आयमेक’ या सेमीकंडक्टर संशोधन संस्थेची महाराष्ट्रातील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी भागीदारी व्हावी. उत्पादन, संशोधन, डिझाईन, कौशल्य आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये संयुक्त उपक्रम राबविता येतील, असे त्यांनी सांगितले.
हरित हायड्रोजन, सेमी कंडक्टर, औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, चक्रीय अर्थव्यवस्था आणि ग्रीन टेक्नॉलॉजीतही सहकार्याची मोठी क्षमता आहे. औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यसेवा आणि संशोधन क्षेत्रात बेल्जियमच्या उद्योग व संस्थांनी महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पांमध्ये सहभागी व्हावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बंदर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील भागीदारीला प्राधान्य
महाराष्ट्रात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण असून वाढवण येथे देशातील महत्त्वाचे खोल समुद्री बंदर विकसित होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई महानगर प्रदेशातील बहुपर्यायी दळणवळण प्रकल्पांमुळे महाराष्ट्र जागतिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून पुढे येत आहे. अँटवर्प-ब्रुज बंदर आणि महाराष्ट्रातील बंदर परिसंस्थेदरम्यान तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, हरित नौवहन, हायड्रोजन, लॉजिस्टिक्स आणि कौशल्य विकास क्षेत्रांत भागीदारी वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले.
अँटवर्प हे जगातील प्रमुख हिरे व्यापार केंद्र असून मुंबईतील भारत डायमंड बोर्स हे भारताच्या हिरे व्यापाराचे केंद्र आहे. हिरे व्यापाराबरोबरच वित्त, बंदरे, लॉजिस्टिक्स, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकास क्षेत्रांतही मुंबई-अँटवर्प आर्थिक भागीदारी विकसित करता येईल. यासाठी दोन्ही देशांतील शासन, बंदर प्राधिकरणे, वाणिज्य मंडळे आणि उद्योगांच्या सहभागातून औपचारिक व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला.

समन्वयासाठी स्वतंत्र टीम तयार करणार
भारत-बेल्जियम गुंतवणूक जलदगती यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील निवडक महत्वाकांक्षी प्रकल्प निश्चित करून त्यांची वेगाने अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी महाराष्ट्र शासन बेल्जियममधील संबंधित संस्था आणि उद्योगांशी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
बेल्जियमच्या उद्योगांनी आपले तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पना महाराष्ट्रात आणाव्यात. महाराष्ट्रात उत्पादन आणि नवोन्मेष करून येथून भारतासह जागतिक बाजारपेठेला सेवा द्यावी. मुंबई ते अँटवर्प, महाराष्ट्र ते बेल्जियम आणि भारत ते युरोप असा व्यापार, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि विश्वासाचा नवा आर्थिक मार्ग उभारूया, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार करारातून उद्योग, बंदरे, औषधनिर्मिती आणि हरित ऊर्जेला मोठी संधी - बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर
भारत आणि युरोपने संरक्षणवादाऐवजी परस्पर विश्वास, मुक्त व्यापार आणि धोरणात्मक भागीदारीचा मार्ग स्वीकारला आहे. भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार करारामुळे सुमारे दोन अब्ज ग्राहकांची बाजारपेठ जोडली जाणार असून जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक चतुर्थांश भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या भागीदारीमुळे व्यापार अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल, असे प्रतिपादन बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांनी यावेळी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विचार जगाला सकारात्मक कृतीसाठी प्रेरित करतात. ते दूरदर्शी आणि सुज्ञ नेतृत्व आहे. दिल्लीला भेट देणे हा सन्मान होता, तर देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक असलेल्या मुंबईत येणे आनंददायी आहे. बेल्जियममधील अँटवर्प आणि मुंबई या दोन्ही शहरांची ओळख मूल्यनिर्मिती करणारी व्यापारी केंद्रे म्हणून आहे.
भारत आणि युरोपमधील व्यापारी संबंधांना दोन हजार वर्षांचा इतिहास असल्याचे सांगून बार्ट डी वेव्हर यांनी प्राचीन काळापासून भारतातील मसाले, मोती, रत्ने आणि अन्य वस्तूंना युरोपमध्ये मोठी मागणी होती. आधुनिक भाषेत हीच पुरवठा साखळी असून जागतिक व्यापाराच्या यशासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
हा केवळ व्यापार करार नसून परस्पर विश्वास, सन्मान आणि धोरणात्मक खुलेपणाचे प्रतीक आहे. या करारामुळे उद्योग, विद्यार्थी आणि युवा प्रतिभेला संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
बेल्जियमचे अन्नप्रक्रिया, गोठविलेले अन्नपदार्थ आणि शीतसाखळी व्यवस्थापनातील कौशल्य भारतीय उद्योगांसाठी उपयुक्त ठरेल. भारतीय सागरी खाद्यपदार्थांसाठी, विशेषतः कोळंबी निर्यातीसाठी अँटवर्प-ब्रूज बंदर महत्त्वाचे केंद्र आहे. भारत हे हिऱ्यांचे उगमस्थान, तर अँटवर्प हे जागतिक हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. हिरे व्यापारामुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध निर्माण झाले आहेत. अँटवर्पमधील भारतीय समुदायाने बेल्जियमच्या व्यापारी जीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून हा समुदाय दोन्ही देशांना जोडणारा मजबूत दुवा आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
मुक्त व्यापार करारामुळे ९५ टक्क्यांहून अधिक भारतीय आणि युरोपीय वस्तूंवरील आयात शुल्क रद्द अथवा कमी होणार आहे. वस्त्रोद्योग, तयार कपडे, पादत्राणे, यंत्रसामग्री आणि वाहनांचे सुटे भाग या क्षेत्रांतील कंटेनर वाहतुकीला याचा मोठा लाभ होईल. बंदर विकास, ड्रेजिंग, सागरी सेवा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात बेल्जियमला असलेला अनुभव भारताच्या महत्त्वाकांक्षी सागरी विकास कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरू शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
अँटवर्प-ब्रूज बंदरातील कंपन्या, टर्मिनल ऑपरेटर तसेच लॉजिस्टिक्स, रसायन आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताला भेट देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. हे शिष्टमंडळ केवळ संभाव्य सहकार्यावर चर्चा करण्यासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी येईल, असेही वेव्हर यांनी स्पष्ट केले.

मुक्त व्यापार करारामुळे सर्व क्षेत्रांना संधी – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि युरोपातील सुमारे दोन अब्ज लोकसंख्या, जागतिक व्यापाराचा मोठा हिस्सा आणि विशाल बाजारपेठ परस्परांशी जोडली जाणार आहे. हा करार शेतकरी, मच्छीमार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप, महिला उद्योजक, उत्पादक आणि सेवा क्षेत्रासाठी व्यापक संधी निर्माण करणारा आहे. दोन्ही बाजूंच्या संवेदनशील क्षेत्रांचे हित जपत हा परस्पर लाभाचा करार करण्यात आला आहे.

युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सागरी बंदर असलेले अँटवर्प-ब्रुज भारतीय निर्यातदारांसाठी युरोपच्या औद्योगिक आणि ग्राहक बाजारपेठेचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरेल. बंदराची जलमार्ग, रेल्वे आणि रस्ते वाहतूक व्यवस्था भारतीय उद्योगांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

हिरे व दागिने, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन व बंदरे, संरक्षण व प्रगत उत्पादन तसेच कृषी व अन्नप्रक्रिया या क्षेत्रांमध्ये भारत आणि बेल्जियमच्या क्षमता परस्परपूरक आहेत. बेल्जियमचे तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भांडवल यांना भारताचे कौशल्य, प्रतिभा, युवा लोकसंख्या आणि मोठी बाजारपेठ यांची जोड मिळाल्यास ही भागीदारी जागतिक स्तरावर यशस्वी होईल. कौशल्य विकास, शैक्षणिक पात्रतेची परस्पर मान्यता, संयुक्त पदवी अभ्यासक्रम आणि मनुष्यबळ गतिशीलतेवरही दोन्ही देशांनी भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बेल्जियमचे मुंबईतील महावाणिज्यदूत फ्रॅंक ग्रीकेन्स, अँटवर्प-ब्रुज बंदराचे ग्लोबल पार्टनरशिप डायरेक्टर टॉम मोनबॉलिऊ, मुख्य ग्राहक संपर्क अधिकारी विलियम डेमोर, फ्लँडर्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीएट डेमुंटर यांच्यासह भारत आणि बेल्जियममधील उद्योग, व्यापार, बंदर, गुंतवणूक आणि शासकीय संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !