अतिक्रमणांवर कठोर कारवाईचा इशारा, पार्किंग, फेरीवाले, बंद वाहने आणि विनापरवाना फ्लेक्सवरही प्रशासनाची नजर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे, फेरीवाल्यांचा प्रश्न तसेच रस्त्यांची अपुरी रुंदी या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सत्यवती जोशी सभागृह, कन्याशाळा, वाई येथे प्रशासन, पोलीस, व्यापारी आणि नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या १४ सप्टेंबरपासून वाई शहरातील वाहतूक आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केली. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होण्याची
शक्यता आहे.
बैठकीस नगराध्यक्ष अनिल सावंत, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, नगरसेवक भारत खामकर, नगरसेविका जागृती पोरे, ज्योती गांधी, नूतन मालुसरे, अपर्णा जमदाडे, केतकी पाटणे, पद्मा जाधव, शब्बीर पठाण, सचिन सावंत, प्रसाद बनकर, काशिनाथ शेलार यांच्यासह व्यापारी संघाचे पदाधिकारी, महावितरण, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, महसूल विभागाचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक व व्यापारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी शहरातील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि विविध नागरी समस्यांचा आढावा मांडला. या समस्यांवर प्रशासन, पोलीस, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी अतिक्रमणाबाबत ही तिसरी बैठक असल्याचे सांगत व्यापारी, विक्रेते, ग्राहक आणि वाहनधारक यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी स्वतःच्या जागेतच व्यवसाय करावा, रस्त्यावर माल किंवा जाहिरातीचे फलक ठेवू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील रस्ते रुंद करण्यासाठी नागरिकांची अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करावे लागणार असून त्यासाठी सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे दळवी यांनी सांगितले. सणासुदीच्या काळात दुकानांसमोर लोखंडी जाळ्या लावू नयेत, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि अतिक्रमणाबाबतची ही बैठक शेवटची ठरावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बैठकीत नागरिकांनी शहरातील विविध भागांतील पार्किंगच्या समस्येवर अनेक सूचना मांडल्या. पालिकेच्या जागेत उभी राहणारी नागरिकांची वाहने यासाठी ‘पे अँड पार्क’ योजना सुरू करून पालिकेचे उत्पन्न वाढवावे, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील विनापरवाना फ्लेक्सवर कारवाई करावी, नवीन बांधकामांना दिलेल्या परवानगीनुसारच प्रत्यक्ष बांधकाम झाले आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. किसनवीर चौक ते सरकारी दवाखाना रस्त्यावर होणारे दुचाकी पार्किंग, गणपती मंदिराशेजारी पुलावर बसणारे विक्रेते तसेच पर्यटकांच्या वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी यावरही नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
राष्ट्रवादीचे नगरसेवक भारत खामकर यांनी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी केली. शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करून नवीन कॅमेरे बसवावेत तसेच किसनवीर चौक परिसरातील दुकानदार व कर्मचाऱ्यांसाठी चक्रेश्वर संस्थानची जागा भाडेतत्त्वावर घेऊन माफक दरात दुचाकी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. दत्त मंदिराजवळील नवीन पुलाखाली चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी वाहतुकीचा प्रश्न केवळ पोलिसांच्या माध्यमातून सुटणार नसून पालिका प्रशासन आणि नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. पालिकेने दहा वॉर्डन उपलब्ध करून द्यावेत. पोलीस, होमगार्ड आणि वॉर्डन यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दिवसा मालाची वाहने रस्त्यावर उभी करून माल उतरविण्याऐवजी रात्री दहा नंतर किंवा सकाळी लवकर गाडीतील माल उतरवावा, अशी सूचना व्यापाऱ्यांना करण्यात आली. विनापरवाना फ्लेक्स लावल्यास गुन्हा दाखल केला जाईल, तसेच दुकानाबाहेर रस्त्यावर साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा साळुंखे यांनी दिला.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी १४ सप्टेंबरपासून वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पांढरे पट्टे, दिशादर्शक फलक आणि आवश्यक वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बँकेमागे पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सुमारे ४०० ते ५०० टपऱ्यांपैकी अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण विभागासाठी पाच वाहनांचा ताफा उपलब्ध करण्याचा ठराव मंजूर झाला असून, अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
भाजी मंडई परिसरात बूम बॅरियर उभारण्याचा मानस असून, शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगवरही कारवाई केली जाणार आहे. “५० हजार नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काही जणांवर कठोर कारवाई करावी लागली तरी ती केली जाईल,” असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष सावंत यांनी दिला.
शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि अकॅडमी यांनी रस्त्यावर पार्किंग न करता स्वतःच्या जागेत वाहनांची व्यवस्था करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. कमी उंचीच्या विद्युत तारांबाबत महावितरणला पत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील अनेक रस्त्यांवर दोन्ही बाजूंना कायमस्वरूपी वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर दीर्घकाळ उभी असलेली बंद वाहने हटवून ती एका निश्चित डेपोमध्ये जमा करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या.
शहरातील वाहतूक आराखड्याबाबत नागरिकांना माहिती मिळावी यासाठी रिक्षाद्वारे जनजागृती करण्यात यावी, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सोशल मीडियासह विविध माध्यमांतून दिलेल्या सूचनांचा विचार केला जात असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
वाई शहराला विद्रूप होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी प्रत्येक वाईकराची आहे. प्रशासन, पोलीस, व्यापारी आणि नागरिकांनी हातात हात घालून काम केल्यास वाहतूक आणि अतिक्रमणाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करत लवकरच संवाद मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सावंत यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, व्यापारी आणि नागरिकांचे आभार मानले.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























