प्रकृतीची चौकशी करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
वैचारिक मतभेद आणि राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून एकमेकांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची महाराष्ट्राची थोर राजकीय संस्कृती माढा मतदारसंघात पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी ज्येष्ठ नेते व माजी आमदार बबनदादा शिंदे यांची निमगाव येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी बबनदादांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत त्यांना स्वतःची काळजी घेण्याची नम्र विनंती केली, तसेच वाढदिवसाच्या व उत्तम आरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
काही महिन्यांपूर्वी माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर अमेरिकेत हृदय प्रत्यारोपणाची (हार्ट ट्रान्सप्लांट) अतिशय किचकट व महत्त्वाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याने माढा मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेते बबनदादांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करत होते आणि ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत होते.
या कठीण काळात आमदार अभिजीत पाटील यांनी सातत्याने बबनदादांच्या प्रकृतीची आस्थेने माहिती घेतली होती. शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतरही त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी चौकशी करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा पाठवल्या होत्या.
अमेरिकेतील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बबनदादा शिंदे मायदेशी परतले असता, त्यांच्या पाठीराख्यांनी व चाहत्यांनी अतिशय जंगी आणि जल्लोषात त्यांचे स्वागत केले होते. तसेच अलिकडेच त्यांचा ७५ वा वाढदिवस देखील मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आमदार अभिजीत पाटील यांनी स्वतः निमगाव येथे जाऊन बबनदादांची प्रत्यक्ष भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय आपुलकीच्या वातावरणात संवाद झाला. आमदार पाटील यांनी बबनदादांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
आजच्या राजकीय वातावरणात राजकीय वैर वैयक्तिक पातळीवर नेण्याचे प्रमाण वाढत असताना, माढा मतदारसंघातील या दोन प्रमुख नेत्यांच्या आपुलकीच्या आणि सलोख्याच्या भेटीने राजकीय संस्कृतीचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. या भेटीची सध्या माढा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार आणि सकारात्मक चर्चा सुरू आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























