शाळेची प्रगती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आपला मुख्य ध्यास राहील
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जांब (ता. वाई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद शंकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शाळेच्या भौतिक विकासाला तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
निवड जाहीर झाल्यानंतर नूतन अध्यक्ष विनोद शिंदे यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जांब तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले, "शाळेच्या सर्वांगीण विकासात आणि शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यात शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते."
सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष विनोद शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. "शाळेची प्रगती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आपला मुख्य ध्यास राहील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व इतर सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
येणाऱ्या काळात शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि व्यवस्थापन समिती यांच्यात उत्तम समन्वय साधून विविध उपक्रम राबवण्यावर भर दिला जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या निवड कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका केंजळे मॅडम, जठार मॅडम, किर्वे मॅडम, मुळे सर, जांब तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद शिंदे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























