गुरुजी की गुंड - वाई तालुक्यात संतापाची लाट

"मी तुमच्या बहिणीसारखी आहे, मला मारू नका!" – वाईत विकृत मुख्याध्यापकाचा महिला शिक्षिकेवर अमानुष हल्ला

Headmaster assaults woman, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि मुलींच्या शिक्षणाचा ऐतिहासिक पाया रचणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. खावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका विकृत आणि गुंड प्रवृत्तीच्या मुख्याध्यापकाने आपल्याच सहकारी महिला शिक्षिकेला लाकडी दांडक्याने निर्दयीपणे बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेने वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली असून, वाई तालुका शिक्षक संघटना अत्यंत आक्रमक झाली आहे.

     पीडित महिला शिक्षिका या खावली जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्या काही दिवसांपूर्वी ५ दिवसांच्या शासकीय प्रशिक्षणासाठी पाचवड येथे गेल्या होत्या. त्या दरम्यान शाळेतील एका निष्पाप विद्यार्थ्याला वर्गाबाहेर चप्पल काढतात त्या ठिकाणी बसवून मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित (रा. वडयली, ता. वाई) याने अत्यंत हीन वागणूक दिली होती.

     प्रशिक्षण संपवून जेव्हा महिला शिक्षिका शाळेत परतल्या, तेव्हा पीडित विद्यार्थ्याचे वडील संतोष वाडकर (रा. माची, ता. वाई) यांनी वर्गशिक्षिका म्हणून त्यांच्याकडे या अमानुष वागणुकीबाबत विचारणा केली. मुलांच्या अभ्यासावर आणि मनावर याचा वाईट परिणाम होतो, हे जाणून महिला शिक्षिका यांनी अत्यंत नम्रपणे मुख्याध्यापक दीक्षित याला विचारणा केली. मात्र, सुसंस्कृत शिक्षकी पेशाला न शोभणाऱ्या शब्दांत मुख्याध्यापक दीक्षित याने दमदाटी करत, "तुम्ही वर्गशिक्षिका आहात, तुम्हीच काय ते मिटवा, माझ्याकडे का आलात?" असे म्हणत थेट "तुम्हाला बघून घेतो" अशी धमकी दिली.

     दि. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली. मुख्याध्यापक दीक्षित हा वर्गातील दोन निष्पाप मुलांना अमानुषपणे मारहाण करत होता. ते पाहून पीडित महिला शिक्षिका यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला व मुलांना परिपाठासाठी पाठवण्यास सांगितले.

     या साध्या बोलण्याचा राग डोक्यात घालून मुख्याध्यापक दीक्षित सैरावैरा झाला. त्याने अत्यंत मोठ्या आवाजात शिवीगाळ करत थेट हातामध्ये लाकडी दांडके घेतले आणि महिला शिक्षिका यांच्यावर धावून गेला. जीव वाचवण्यासाठी पीडित शिक्षिका मैदानाकडे पळू लागल्या, परंतु या नराधमाने त्यांचा पाठलाग केला. त्यांना गाठून पाय, हात, पाठ आणि मानेवर लाकडी दांडक्याने सपासप वार केले.

अत्यंत गंभीर बाब म्हणजे, मारहाण सुरू असताना पीडित शिक्षिका अत्यंत वेदनेने विव्हळत "मला लहान मुलगी आहे, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, मला मारू नका!" अशी गयावया करत विनवणी करत होत्या. मात्र, या नराधमाच्या डोक्यातील भूत उतरले नाही. शाळेतील दुसऱ्या एका महिला शिक्षिकेने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र दीक्षित त्यांनाही दाद देईना.

     या भयानक मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पीडित महिला शिक्षिका यांना तात्काळ वाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाई पोलिसांनी तातडीने पीडित शिक्षिकेचा जबाब नोंदवून तक्रारीनुसार आरोपी मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार होण्याच्या बेतात असलेल्या या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस हवालदार किरण यशवंत इथापे करत आहेत.

     या अमानुष आणि संतापजनक घटनेनंतर वाई तालुका शिक्षक संघटना अत्यंत आक्रमक झाली आहे.

"विद्यार्थ्यांसमोरच एका महिला शिक्षिकेवर असा क्रूर आणि अमानुष हल्ला करणाऱ्या मुख्याध्यापकाला शिक्षक म्हणणे हा या पवित्र पेशाचा अपमान आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित याला तात्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करावे. जर प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली नाहीत, तर वाई तालुक्यातील सर्व शिक्षक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील!" असा इशारा वाई तालुका शिक्षक संघटनांनी दिला आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !