वाई नगरपरिषद निविदा वाद - विरोधकांचे आरोप फुसका बार - नगराध्यक्ष अनिल सावंतांचा थेट पलटवार

'सृष्टी कन्स्ट्रक्शन'शी संबंध नाही; निविदा प्रक्रियेमुळे वाई नगरपालिकेचे ७५ लाख वाचले!

Municipal Council Tender Dispute, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

 सोशल मीडियावर वाई नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेवरून आणि नगरपालिकेच्या कारभारावर संशयाचे वातावरण निर्माण करणाऱ्या पोस्टला नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांचे सर्व आरोप पुराव्यानिशी खोडून काढत, या संपूर्ण प्रक्रियेत वाई नगरपालिकेची तब्बल ७५ लाख रुपयांची मोठी आर्थिक बचत झाल्याचा खळबळजनक खुलासा नगराध्यक्षांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात या व्हायरल पोस्टमुळे विविध चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सत्य परिस्थिती वाईकरांसमोर मांडली.

     नगराध्यक्षांनी स्पष्ट केले की, "संपूर्ण निविदा प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने नगर परिषद प्रशासनाकडून राबवली जाते. याच्या 'कीज' केवळ अधिकाऱ्यांकडेच असतात, त्यामुळे यात कोणताही लोकप्रतिनिधी किंवा नगराध्यक्ष थेट हस्तक्षेप करू शकत नाही. निविदा समितीमध्ये मुख्य अधिकारी, लेखापाल, लेखापरीक्षक आणि शाखा अभियंता अशा चार जबाबदार अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या समितीने नियमांनुसार १५ टक्के कमी दर असलेली निविदा मंजूर केली आहे." तसेच, सोशल मीडियावर नाव घेतल्या जाणाऱ्या 'सृष्टी कन्स्ट्रक्शन'शी आपला कोणताही संबंध नसून, आपण त्यांना ओळखतही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     नगराध्यक्षांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवताना एका राजकीय पक्षाच्या एजंटचा पर्दाफाश केला. "प्रशासकीय काळात मी माझ्या नेत्यांच्या माध्यमातून वाई नगरपरिषदेला कचरा प्रक्रियेसाठी शासनाकडून ५ कोटींचा निधी आणला आहे. हे काम आपल्यालाच मिळावे यासाठी एका राजकीय पक्षाच्या एजंटने खूप प्रयत्न केले. काही सहकारी नगरसेवकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, तसेच त्याच्याच पक्षाच्या एका मंत्र्यांच्या 'पी.ए.' असल्याचा बनाव करून प्रशासनाला फोनही करवले. परंतु, ही टेंडर प्रक्रिया पारदर्शक व्हावी या माझ्या हट्टामुळे त्याचे मनसुबे धुळीस मिळाले. कचरा प्रक्रियेचा ठेका न मिळाल्याच्या रागातून आणि निवडणुकीतील अपयश पचवता न आल्यानेच हे बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे," असा घणाघात सावंत यांनी केला.

     "मागील १४ महिन्यांपासून ५ कोटी रकमेची निविदा प्रलंबित होती. प्रशासकीय काळातील ८ महिन्यात ही निविदा कोणी थांबवली, याचाही खुलासा मी लवकरच करणार आहे. स्थायी समितीने नुकतीच मंजूर केलेली निविदा ७५ लाख कमी किमतीची, म्हणजेच ४ कोटी २५ लाखांची आहे. हे टेंडर मंजूर करताना वाई नगरपरिषदेचे आणि जनतेचे हित पाहणे जर गुन्हा असेल, तर वाईकरांसाठी हा गुन्हा मी रोज करायला तयार आहे," असा टोला नगराध्यक्षांनी विरोधकांना लगावला.

     "वाई नगरपालिकेतील ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि फाईल्स नगरपालिकेत नागरिकांच्या पाहणीसाठी खुल्या आहेत. कोणत्याही नागरिकाला शंका असल्यास त्यांनी थेट नगरपालिकेत येऊन शहानिशा करावी. निवडणुकीच्या काळात वाईकरांनी ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले, तो विश्वास आम्ही कधीही तुटू देणार नाही. विरोधकांच्या खोट्या आणि बदनामीकारक मोहिमेला बळी न पडता, वाईकरांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे," असे भावनिक व खंबीर आवाहन अनिल सावंत यांनी वाईच्या सुज्ञ नागरिकांना केले आहे.

     नगराध्यक्षांच्या या रोखठोक आणि पुराव्यानिशी केलेल्या खुलाशानंतर वाई शहरातील राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळतो की वाद अजून चिघळतो, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !