समान न्याय व पारदर्शक कारवाईची मागणी
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने आवाज उठवण्यासाठी रामदास दिलीप काटवटे यांनी दि. १० ऑगस्ट २०२६ पासून उंब्रज येथे आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काटवटे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
गट क्रमांक ११७२/७३ तसेच इतर शासकीय जागांवरील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर समान व निष्पक्ष कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी काटवटे यांनी केली आहे. तसेच त्यांच्या ५×५ फूट उपजीविकेच्या दुकानावर कोणतीही नोटीस न देता करण्यात आलेल्या कारवाईची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
उंब्रज बाजारपेठेतील अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी, आपल्या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तसेच करण्यात आलेल्या कारवाईच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करून द्याव्यात आणि प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी, अशा विविध मागण्या काटवटे यांनी प्रशासनासमोर मांडल्या आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत उंब्रज येथील ग्रामसेवक समाधान माने यांच्यावरही काटवटे यांनी आरोप केले आहेत. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ करणे, नागरिकांशी अरेरावी व गैरवर्तन करणे तसेच दुजाभावाची वागणूक देणे, असे आरोप त्यांनी केले असून या प्रकरणाची विभागीय चौकशी करून सेवा नियमांनुसार निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
“एकच मागणी—समान न्याय, पारदर्शक कारवाई!” अशी भूमिका मांडताना काटवटे म्हणाले, “अन्याय थांबवा, न्याय द्या. प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी.”
आपल्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही काटवटे यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, उपोषणस्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी वाढत असून या आंदोलनाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे उंब्रज परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























