नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणावर घणाघाती प्रहार
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
राजकीय आरोप-प्रत्यारोप, “मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा” या संकुचित राजकारणात जर वाईच्या विकासाला खीळ बसणार असेल, तर हे वाईकरांचे दुर्दैव ठरेल. विकासाच्या कामांमध्ये राजकारण आणून अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते कदापि सहन केले जाणार नाहीत. वाईचा विकास थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे—मी दबणारा नाही, घाबरणारा नाही आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढताना मागे हटणारा तर अजिबात नाही! असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला.
वाई शहराच्या विकासात्मक दृष्टीने नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या विविध कामांकडे काही मंडळी राजकीय चष्म्यातून पाहत आहेत. काही वृक्षप्रेमींच्या आडून काही राजकीय कार्यकर्ते माझ्यावर वारंवार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, माझ्यासाठी राजकारणापेक्षा वाईचा विकास आणि वाईकरांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी ठाम भूमिका सावंत यांनी व्यक्त केली.
“मी वाईकरांना शब्द दिला आहे आणि त्या शब्दाला जागणे ही माझी जबाबदारी आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिले. हा विजय माझ्या ताकदीचा नसून वाईकरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा आणि प्रेमाचा विजय आहे. त्या विश्वासाशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच येत नाही,” असे सावंत यांनी स्पष्ट केले.
“मी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे. लोकांच्या हिताचे निर्णय घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. माझ्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न कोणीही करू नये,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
सावंत पुढे म्हणाले की, “मी कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेलो नाही. माझ्या तोंडात सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो नाही. माझ्या पाठीशी कुठली मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला सामान्य माणूस आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या अडचणी मला कळतात, त्याच्या वेदना मला समजतात आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढत आहे.”
वाईकरांनी दिलेल्या विश्वासामुळेच आज आपण नगराध्यक्षपदावर असल्याचे सांगताना सावंत म्हणाले, “जनतेने मला त्यांच्या मनात आणि हृदयात स्थान दिले. त्या विश्वासाची परतफेड करण्यासाठी मी दिवस-रात्र काम करत आहे. जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाचा आधार घेत काही मंडळी विकासकामांना विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “एखाद्या कामाबाबत मतभेद असू शकतात, चर्चा होऊ शकते, सूचना देता येतात; पण वाईच्या विकासाच्या कामांमध्ये अडथळे आणणे हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. विकास थांबवण्यासाठी राजकीय दबाव निर्माण केला जात असेल, तर तो वाईकरांच्या हिताविरोधात आहे,” असे सावंत म्हणाले.
मंडई परिसरातील वृक्षछाटणीवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “मंडई परिसरात वृक्षांची छाटनी गोरगरीब महिला व मंडईतील भाजी विक्रेते यांच्या सांगण्या वरून झाली आहे धोकादायक झाडांचे साठे वरील बाजूला वाई अर्बन बँक /जिल्हा बँक तसेच तेथे असणारे सर्व व्यापारी यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे वाळवी मुळे झाडाची खोडे पण कमकुवत झाली आहेत मी एक हाडाचा शेतकरी सुद्धा आहे माझ्या शेतात आणि प्रोजेक्ट मध्ये शेकड्या मध्ये झाडे लावून जगवली आहेत वृक्षांचे महत्त्व आम्हालाही कळते. पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, याबाबत दुमत नाही. परंतु विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधत शहराच्या गरजा पूर्ण करणेही तितकेच आवश्यक आहे. प्रत्येक विकासकामाकडे केवळ राजकीय विरोधाच्या भूमिकेतून पाहणे योग्य नाही,” असे त्यांनी सांगितले.
“मला ‘याची जिरव, त्याची जिरव’, ‘जिरवा-जिरवी’ किंवा ‘गाडा-गाडी’चे राजकारण करायचे नाही. माझे राजकारण सूडाचे नाही; माझे राजकारण समाजाच्या हिताचे आहे. कोणाला नामोहरम करणे हा माझा अजेंडा नाही. वाईकरांचे जीवनमान उंचावणे, शहराचा विकास करणे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणे हेच माझे ध्येय आहे,” असे सावंत यांनी ठणकावून सांगितले.
आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उत्तर देताना सावंत यांनी भावनिक शब्दांत भूमिका स्पष्ट केली. “मी थांबणारा कार्यकर्ता नाही. मी घाबरणारा कार्यकर्ता नाही. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाच्या बळावर मी उभा आहे. माझी ताकद कोणतीही राजकीय खुर्ची नाही; माझी ताकद वाईकर जनता आहे!”
“मी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहे आणि पुढेही झटत राहणार आहे. मात्र, माझ्या कामात कोणी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करू नयेत. माझा वैयक्तिक कोणाशीही संघर्ष नाही; माझा संघर्ष आहे तो वाईच्या विकासासाठी. त्यामुळे वैयक्तिक राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र यावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
शेवटी सावंत यांनी वाईकरांना भावनिक आवाहन करताना म्हटले, “वाईचा विकास हा माझा एकट्याचा विषय नाही; तो आपल्या सर्वांचा विषय आहे. मी पक्ष म्हणून नव्हे, तर कार्यकर्ता म्हणून सर्वांना माझ्यासोबत येण्याचे आवाहन करतो. मतभेद असतील तर चर्चा करूया, सूचना असतील तर स्वीकारूया; पण विकासाच्या आड कोणीही येऊ नये. कारण ही लढाई अनिल सावंत यांची नाही—ही लढाई वाईच्या भविष्यासाठी आहे.”
“वाईकरांच्या हितासाठी मी कायम एकरूप राहीन, कायम शांत राहून दोन पावले मागे जाण्याची हि तयारी आहे सर्व मार्गदशकांना विनंती आहे हीच जागरूकता मार्गदर्शनात दाखवा मी आपणाला मीटिंग साठी लवकरच निमंत्रित करतो मी जनतेची सेवा करत राहीन आणि विकासाच्या मार्गावरून एक पाऊलही मागे हटणार नाही,” असा निर्धार नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी व्यक्त केला.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























