कर्तव्यापुढे स्वतःचा जीवही क्षुल्लक
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी - शुभम कोदे
"कर्तव्यापुढे स्वतःचा जीवही क्षुल्लक!" या उक्तीची प्रचीती देणारी एक थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना आषाढी वारीदरम्यान घडली. वाई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ रोहिदास टिके यांनी आगीच्या भडक्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून तब्बल १५ ते १६ गॅस सिलिंडर सुरक्षित बाहेर काढले आणि शेकडो वारकऱ्यांचे प्राण वाचवून एक भीषण दुर्घटना टळवली. त्यांच्या या अद्वितीय शौर्यामुळे संपूर्ण वाई तालुक्यासह महाराष्ट्र पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे.
२४ जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाखरी (ता. पंढरपूर) येथे दाखल होत असताना पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ टिके हे बंदोबस्ताच्या कर्तव्यावर होते. पालखीच्या सुमारे १०० मीटर पुढे असलेल्या दिंडीच्या दोन ट्रकमधील गॅस सिलिंडरच्या पाईपमधून अचानक गॅस गळती होऊन भीषण आग भडकली.
ट्रकमध्ये तब्बल १५ ते १६ गॅस सिलिंडर असल्याचे टिके यांच्या निदर्शनास आले. जर हे सिलिंडर फुटले असते, तर काही क्षणांतच स्फोटांची मालिका होऊन संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला असता आणि हजारो वारकऱ्यांच्या जीवावर बेतले असते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणचाही विलंब न करता कॉन्स्टेबल सोमनाथ टिके यांनी थेट जळत्या ट्रकमध्ये प्रवेश केला. आगीच्या भीषण ज्वाळांमध्ये त्यांनी एकामागून एक गॅस सिलिंडर बाहेर फेकण्यास सुरुवात केली. याच दरम्यान ट्रकखाली आधीपासून जळत असलेल्या एका सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या प्रचंड धक्क्यानंतरही टिके यांनी आपले धैर्य ढळू दिले नाही. त्यांच्या या धाडसाने प्रेरित होऊन ट्रकमधील काही वारकरीही मदतीसाठी धावले आणि सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे उर्वरित सर्व सिलिंडर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या धाडसी आणि अतुलनीय कामगिरीमुळे पंढरपूर परिसरातील एक संभाव्य मोठी जीवितहानी टळली. धोक्याच्या क्षणी स्वतःचा जीव पणाला लावून जनतेचे रक्षण करणाऱ्या सोमनाथ टिके यांच्या या कर्तव्यनिष्ठेची दखल घेत पालखी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती घनवट यांनी त्यांचा विशेष सत्कार करून सन्मानचिन्ह प्रदान केले.
संकटाच्या काळात वारकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत देवदूताप्रमाणे धावून गेलेले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ टिके हे आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय ठरले आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























