सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
शहरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासकीय योजनांचा अपहार व लाभ मिळवून देणाऱ्या एका मोठ्या आणि सुनियोजित रॅकेटचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या गंभीर प्रकरणात एका निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बाजार पोलिस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. रतीफ देवलाल जंकर यांनी फिर्याद दिली आहे.
कसे उघडकीस आले प्रकरण?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात अहमदनगर येथील कंत्राटी लिपिक राजेश भाऊसाहेब जाधव याने बनावट [आधारकार्ड Redacted] व अन्य कागदपत्रांच्या आधारे ऑनलाइन प्रक्रियेतून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेऊन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी या प्रकरणाचा तपास तत्काळ शहर गुन्हे शाखेकडे वर्ग केला.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयित राजेश जाधव याला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर या रॅकेटचे जाळे उघड होत गेले.
अटक करण्यात आलेले संशयित आरोपी:
राजेश भाऊसाहेब जाधव (कंत्राटी लिपिक, अहमदनगर),डॉ. सतीश कणके (निवासी वैद्यकीय अधिकारी),महेश बाराजे, राजेश दवणे,विजय गर्जे
,अरुण शिंपी,वसीम शौकत खान, सागर रजपूत
तांत्रिक पुरावे आणि जप्ती
पोलिसांनी आरोपींकडून बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले संगणक, हार्डवेअर आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त केले आहे. याशिवाय, ज्या सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील संगणकावरून ही बोगस प्रमाणपत्रे तयार केली जात होती, तो संगणकही पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात आठ संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्रे कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता परस्पर वितरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोठ्या रॅकेटची शक्यता आणि पुढील तपास
या प्रकरणानंतर सोलापूर सिव्हिल रुग्णालयातून १ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२६ या दीड वर्षाच्या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या तब्बल ३,७१४ दिव्यांग प्रमाणपत्रांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही मोठे मासे किंवा वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या तपासातून अजून काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदर धडाकेबाज कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























