आमदारांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवून चिथावणी; सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा,सोलापूर (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवून हत्येची सुपारी देण्याचा गंभीर प्रकार सोलापूर शहरात उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे सोलापूरसह राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका काय घडला प्रकार?
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे चालक आनंद स्वामीराव सुरवसे (वय ३०, रा. मोटयाळ, ता. अक्कलकोट) हे ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास आमदारांच्या पत्नी आणि मुलाला घेऊन महावीर चौकातील एका शोरूमबाहेर थांबले होते. आमदारांचे कुटुंबीय खरेदीसाठी शोरूममध्ये गेले असताना एका अज्ञात इसमाने चालकाजवळ येऊन, "तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदारला गोळी घालून मार, मी पुढचे बघून घेतो," असे सांगत जीवे मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न केला.
त्याच्यासोबत आलेल्या दुसऱ्या इसमानेही "साहेब काय म्हणतात ते नीट ऐक, त्यात तुझा फायदा आहे," असे म्हणून चालकाला चिथावणी दिली. दरम्यान, घटनास्थळी आलेल्या एका अन्य व्यक्तीने मध्यस्थी करत त्या दोघांना तेथून निघून जाण्यास सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख
या घटनेमुळे घाबरलेल्या चालक आनंद सुरवसे यांनी घडलेला प्रकार सायंकाळी आमदारांचे पी.ए. आणि भावाला सांगितला. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी केली असता चालकाला चिथावणी देणारे आरोपी श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी असल्याचे निष्पन्न झाले.
सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा आणि हत्येचा कट रचण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालक आनंद सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांनी आरोपी श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५) व ५५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सदाशिव सावंत करत आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























