वाई तालुक्यातील विरमाडे येथील मुनलाईट बारसमोरील घटना; भुईंज पोलिसांत शुभम शिवनकरविरोधात गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
मित्रांमधील साध्या चेष्टा-मस्करीवरून झालेल्या गैरसमजातून एका तरुणावर डोक्यात कडे मारून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाई तालुक्यातील विरमाडे हद्दीतील मुनलाईट बारसमोर घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, भुईंज पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रसाद दिलीप शिंगटे (वय २८, रा. मर्ढे, ता. जि. सातारा) हे डी.सी.सी. बँक वाहगाव शाखा येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते विरमाडे येथील मुनलाईट बारसमोर आपल्या मित्रांसोबत उभे राहून गप्पा मारत होते. त्या वेळी प्रसाद यांनी मित्रांशी थोडी चेष्टा-मस्करी केली.
दरम्यान, बारमधून बाहेर पडलेला आरोपी शुभम जयवंत शिवनकर (रा. खर्शी, ता. जावली, जि. सातारा) याने प्रसाद हे स्वतःलाच शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करून घेतला. "तू मला शिव्या का दिल्या?" अशी विचारणा करत त्याने वाद उकरून काढला.
वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या शुभम शिवनकर याने हातातील कडे काढून थेट प्रसाद यांच्या डोक्यात आणि नाकावर जोरात प्रहार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रसाद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेले मित्र सोमनाथ विलास पवार, धनंजय बोडरे आणि साहेब इनामदार यांनी तातडीने मध्यस्थी करत सोडवासोडव केली, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. पळून जाताना आरोपीने "तुला जिवंत सोडणार नाही, बघून घेईन," अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर जखमी प्रसाद शिंगटे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपी शुभम शिवनकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल साळुंखे करत आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























