मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक, राष्ट्रसेवा दलाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय महांगडे यांना सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल इचलकरंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेचा प्रतिष्ठेचा 'वसुंधरा पुरस्कार–२०२६' प्रदान करण्यात आला.
इचलकरंजी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात माजी खासदार तथा कर्नाटक बँकेच्या संचालिका डॉ. निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महासंचालक, भारतीय क्रीडा विकास निलेश राणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उदय धातुंडे, राजेंद्र काणे, रवींद्र माने, सत्यवान हाके, प्रशांत देवकर, विजय तोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दत्तात्रय महांगडे यांनी राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करताना वाई तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे माजी उपाध्यक्ष म्हणून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संस्कार आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही महांगडे हे समाजकार्यात सक्रिय असून, "आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो" या भावनेतून त्यांनी अनेक विवाह जुळवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमधील अभिनयातून त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
या सन्मानानंतर विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच वाई तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले. दत्तात्रय महांगडे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे वाई तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



