महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली निवडणूक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
राज्याध्यक्षपदी डॉ. प्रशांत गणेश कुलकर्णी
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे शिक्षणतज्ज्ञ आणि दिशा अकॅडमीचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांची राज्याच्या सरचिटणीसपदी बहुमताने निवड झाली. महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. राज्याध्यक्षपदी डॉ. प्रशांत गणेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
अनेक वर्षे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा
प्रा. डॉ. नितीन कदम यांनी दिशा अकॅडमीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम परंपरा निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज देशातील नामांकित संस्था तसेच परदेशातील विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध अध्यापन आणि सातत्यपूर्ण निकालांमुळे दिशा अकॅडमीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात. गुणवत्ता, शिस्त, विद्यार्थीकेंद्री अध्यापन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांमुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या विविध उपक्रमांमध्ये प्रा. डॉ. नितीन कदम यांनी अनेक वर्षे सक्रिय सहभाग नोंदवत कोचिंग क्लासेस क्षेत्रातील प्रश्न सातत्याने मांडले आहेत. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांच्यावर राज्याच्या सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून राज्यभरातील कोचिंग क्लास संचालकांचे प्रश्न शासनापुढे प्रभावीपणे मांडणे, संघटना अधिक सक्षम करणे आणि क्लासेस क्षेत्राला संघटित दिशा देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सन २००० मध्ये स्थापन झालेली प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ही महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस संचालकांची सर्वांत जुनी व शिखर संघटना असून राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये तिचे हजारो सभासद आहेत. नवनिर्वाचित राज्याध्यक्ष डॉ. पी. कुलकर्णी हे संस्थापक सदस्य, अनुभवी क्लास संचालक, माजी प्राचार्य, विद्यापीठाचे माजी सल्लागार तसेच डिजिटल शैक्षणिक स्टार्टअपचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी कार्याध्यक्षपदी विकास कदम (लातूर), प्रल्हाद दौंड (पुणे), भैय्यासाहेब मगर (अंमळनेर-जळगाव) आणि योगीराज आरसोड (यवतमाळ), तर उपाध्यक्षपदी विनायक परिचारक (पंढरपूर) आणि रविंद्र दारव्हटकर (चंद्रपूर) यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीने कोचिंग क्लासेस क्षेत्रासमोरील विविध समस्या, बेकायदेशीर स्पर्धा, डिजिटल व कॉर्पोरेट शिक्षण संस्थांचे वाढते आव्हान तसेच या क्षेत्राला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्यातील हजारो क्लास संचालकांच्या हक्कांसाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास नवनिर्वाचित राज्याध्यक्ष डॉ. पी. कुलकर्णी आणि राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. नितीन कदम यांनी व्यक्त केला.
निवडणूक प्रक्रिया डॉ. रविंद्र फडके आणि डॉ. रविकांत शितोळे यांच्या निवडणूक समितीने यशस्वीपणे पार पाडली. प्रा. डॉ. नितीन कदम यांच्या राज्य सरचिटणीसपदी झालेल्या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय निवडीमुळे वाईच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावला असून, त्यांच्या कार्याच्या माध्यमातून वाईचे नाव महाराष्ट्रभर अधिक ठळकपणे पोहोचले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



