प्रशासनाचे कानाडोळे, नागरिक संतप्त
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या काही महिन्यांत एवढ्या वेगाने वाढली आहे की नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील जवळपास प्रत्येक चौक, गल्ली आणि मुख्य रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे वावरताना दिसत असून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर भुंकणे, पाठलाग करणे आणि हल्ल्याचा प्रयत्न करणे या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी शालेय लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर स्थानिक स्वराज्य संस्थांना ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असतानाही अनेक नगरपालिकांप्रमाणे वाई नगरपालिकेकडूनही या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसाठी संरक्षित निवारा केंद्रे उभारण्यासह नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
यामागे निधीची कमतरता, मनुष्यबळाचा अभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव ही कारणे असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे, पूर्वी वाई नगरपालिकेमार्फत भटक्या कुत्र्यांची नसबंदी, निर्बिजीकरण आणि अँटी-रेबीज लसीकरणाचे काम नियमितपणे केले जात होते. मात्र संबंधित कंत्राटदाराची मोठी थकबाकी नगरपालिकेकडे प्रलंबित राहिल्याने त्याला वेळेवर देयके मिळाली नाहीत. परिणामी अनुभवी आणि तज्ज्ञ कंत्राटदाराने हे काम बंद केल्याचे समोर आले आहे.
या निष्क्रियतेची किंमत आता सामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे. नसबंदी आणि लसीकरणाची प्रक्रिया थांबल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढत असून त्यांच्या अन्न-पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्याने ही कुत्री अधिक आक्रमक बनत आहेत. अनेक भागांत नागरिकांना रस्त्यावरून चालणेही धोकादायक वाटू लागले आहे.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीबाबत वाईकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. "कुत्र्यांचा प्रश्न नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी नगरपालिका जागी होणार का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. संबंधित कंत्राटदाराची थकीत देयके तातडीने अदा करून नसबंदी, निर्बिजीकरण आणि अँटी-रेबीज लसीकरण मोहीम युद्धपातळीवर पुन्हा सुरू करावी, तसेच भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी ठोस आणि कायमस्वरूपी धोरण राबवावे, अशी जोरदार मागणी वाईकर नागरिकांकडून करण्यात येत आहे.
"प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे; आता तरी झोपेतून जागे व्हा आणि वाईकरांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ कारवाई करा," अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे.
वाई शहरांमध्ये मोकाट फिरत असलेल्या कुत्र्यांची नसबंदी केल्याची बिले पेंडिंग आहेत सांगितले जाते परंतु त्या कुत्र्यांची नसबंदी कशाच्या आधारे केली व कोणाची नसबंदी केली याचा प्रश्न आता नागरिकांनाही पडला आहे नसबंदी केली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पत्ती कशामुळे झाली अशीही चर्चा वाई शहरांमध्ये दबक्या आवाजात चालू आहे
एक सुजाण वाईकर नागरिक
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



