विट्यातील भाविकांच्या गाडीला सुरूरजवळ भीषण अपघात; तिघे चिंताजनक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जेजुरी येथे खंडोबाचे देवदर्शन उरकून आपल्या गावी सांगलीकडे परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला सातारा-पुणे हायवेवर सुरूर (ता. वाई) गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. बोलेरो गाडी महामार्गावरील डिव्हायडरला जोरात धडकल्याने हा अपघात घडला असून, यामध्ये २ ते ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दि. ७ जून २०२६ रोजी रात्री ७:४५ वाजण्याच्या सुमारास हॉटेल साई पार्क इनच्या समोर झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील संदीप संपत शिरतोडे, राजापूर (बोरगाव) येथील महादेव मोहन मदने आणि त्यांचे इतर नातलग असे एकूण ८ ते १० जण बोलेरो गाडी मधून जेजुरीला देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आनंदाने गावी परतत असताना, सुरूर गावच्या हद्दीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो थेट महामार्गाच्या डिव्हायडरला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गाडीतील जखमींना तातडीने बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी कवठे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २ ते ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील आणि अधिक उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील अधिक तपास भुईंज पोलीस करत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



