शिवस्वराज्य गुढीचे थाटात पूजन
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथील पंचायत समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलप्रसंगी पंचायत समितीच्या आवारात 'शिवस्वराज्य गुढी' उभारून तिचे थाटात पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शिवस्वराज्य गुढी पूजन ठरले. सभापती विक्रांत डोंगरे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव आणि पंचायत समिती सदस्या हर्षदा फरांदे यांच्या हस्ते या गुढीचे शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. याप्रसंगी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
सोहळ्याची सुरुवात पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील शिक्षकांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या सामूहिक सादरीकरणाने केली. राष्ट्रभक्ती आणि शिवभक्तीचा हा मेळ उपस्थितांची मने जिंकून गेला. यानंतर प्रसिद्ध शिवशाहीर शरद यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान जीवनकार्यावर आधारित एक बहारदार पोवाडा सादर केला. शाहीर यादव यांच्या पहाडी आवाजाने आणि सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या पोवाड्याला राजेंद्र नलावडे, तानाजी कुंभार, संतोष चौधरी, सहदेव फणसे, बाबासाहेब वाळेकर आणि विठ्ठल सणस यांनी उत्कृष्ट साथ दिली, तर विश्वनाथ कांबळे यांनी ढोलकीवर अप्रतिम थाप धरत कार्यक्रमात रंगत आणली.
या ऐतिहासिक सोहळ्याला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे, डॉ. विनय भोईटे, रियाज सय्यद, बाळू भोईर, साईनाथ वाळेकर यांच्यासह पंचायत समितीचे सर्व विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केल्यानंतर उपस्थितांचे आभार साईनाथ वाळेकर यांनी मानले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



