प्रशासनाच गहाळ कारभार ; जनतेकडे दुर्लक्ष
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
प्रशासनाच्या ढिम्म आणि बेजबाबदार कारभाराचा आणखी एक जिवंत नमुना वरखरवाडीत पाहायला मिळाला आहे. येथील बुवा साहेब मंदिराजवळील अवाढव्य वडाचे झाड आज कोसळल्याने पश्चिम भागात जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वीच या झाडाची एक मोठी फांदी कोसळून धोक्याची घंटा वाजली होती, वृत्तपत्रांनी बातमी लावून प्रशासनाचे कान टोचले होते; मात्र तरीही कुंभकर्णी झोपेतून जागे न झालेल्या प्रशासनामुळे आज अखेर अख्खा वड रस्त्यावर आडवा झाला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या वडाच्या झाडाची एक मोठी फांदी रस्त्यावर कोसळली होती. त्यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि तासनतास वाहतूक ठप्प झाली होती. "झाड कमकुवत झाले आहे, ते कधीही कोसळू शकते," अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती. वृत्तपत्रांनीही या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधून बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र, 'रात गयी, बात गयी' या थाटात प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आधीच कमकुवत झालेल्या या वडाच्या झाडाचा शिल्लक राहिलेला भाग आज थेट मुख्य रस्त्यावर कोसळला. सुदैवाने झाड कोसळले त्या क्षणी तेथून कोणी जात नव्हते, अन्यथा मोठा जीवितहानीचा अनर्थ घडला असता. झाड पडल्यामुळे पश्चिम भागाला जोडणारा हा मुख्य रस्ता आता पूर्णपणे कुलूपबंद झाला आहे.
मुख्य रस्ता बंद झाल्यामुळे वाहनचालक पर्यायी मार्गाचा अवलंब करत आहेत, मात्र हा पर्यायी मार्ग म्हणजे 'दुसऱ्या संकटाला आमंत्रण' ठरत आहे. या पर्यायी रस्त्यावर कॅनलजवळ प्रचंड चिखल झाला असून, वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. चिखलामुळे या मार्गावरही अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
"पंधरा दिवसांपूर्वी जेव्हा फांदी पडली, तेव्हाच प्रशासनाने खबरदारी म्हणून उर्वरित झाड हटवायला हवे होते. पण प्रशासनाला सामान्य जनतेच्या जीवाची काहीच किंमत नाही. आता मुख्य रस्ता तर बंद झालाच, पण पर्यायी चिखलाच्या रस्त्यावरून जाताना कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल वरखरवाडीतील ग्रामस्थ आणि वाहनचालक विचारत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



