मुंबई पोलिसात निवड झालेल्या ग्रामीण कन्यांचा विशेष सत्कार!
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दौलतनगर (ता. पाटण) येथे 'अभ्यागत भेट व जनसंवाद' कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. जनतेचे प्रश्न वेळेत मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांमार्फत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
या जनसंवाद दौऱ्यादरम्यान दौलतनगर व परिसरातील शेकडो नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, महसूल विषयक प्रश्न, शासकीय योजनांचा लाभ तसेच विविध विकासकामांबाबतच्या समस्या व मागण्या पालकमंत्री देसाई यांच्यासमोर मांडल्या. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांनी जागेवरच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते ग्रामीण भागातून संघर्ष करत यश मिळवणाऱ्या कन्यांचा सत्कार! मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल कु. सानिका भिसे (नाडे) आणि सौ. प्रियांका पानस्कर (मल्हारपेठ) यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. "ग्रामीण भागातील आपल्या मुली आज विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळवत आहेत, ही संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे," अशा शब्दांत नामदारांनी त्यांचे कौतुक केले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विकासकामांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून कराटे, म्हावशी आणि मारुल तर्फे पाटण परिसरातील अनेक प्रमुख राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. देसाई यांनी सर्व नवप्रवेशितांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत केले. "नव्या सहकाऱ्यांच्या सोबतीने जनतेची सेवा आणि पाटण तालुक्याच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान व बळकट होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"दौलतनगर परिसरातील नागरिकांना थेट संवादातून आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाली, याचा मला मनस्वी आनंद आहे. जनतेचा विश्वास, लोकसेवा आणि विकास हीच माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची खरी प्रेरणा आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन," असे ना. शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.
थेट संवादामुळे आपल्या हक्काच्या नेत्याकडे थेट गाऱ्हाणे मांडता आल्याने दौलतनगर परिसरातील नागरिकांमधून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी आणि विविध विभागांचे शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



