वाई पालिकेचा भोंगळ कारभार उघड! विरोधकांचे मौन मात्र संशयास्पद
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरात बसविण्यात येत असलेल्या ‘नो पार्किंग’ आणि फेरीवाला पार्किंग फलकांच्या कामाचा मोठा गाजावाजा काही नगरसेवकांच्या पतींकडून सोशल मीडियावर करण्यात आला होता. "काम जोरात सुरू आहे", "शहराचा विकास वेगाने सुरू आहे" अशा पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात या कामाचा दर्जा पाहिल्यानंतर पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महागणपती पुलासह शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेले फलक अत्यंत निकृष्ट पद्धतीने बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. हे फलक कोणत्याही मजबूत पायाशिवाय केवळ पत्र्याच्या कुंडीत उभे करण्यात आले असून त्यामध्ये सिमेंट भरून उभे केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा पद्धतीने बसविण्यात आलेले फलक एक महिना तरी टिकतील का, व ते कोणीही काढून घेऊ शकते अशा परिस्थितीमध्ये हे बोर्ड बसवलेले आहेत असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. इतक्या निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेच्या पैशाची अक्षरशः उधळपट्टी होत असताना सत्ताधारी तर सोडाच, विरोधी पक्षातील एकाही नगरसेवकाने साधा निषेधाचा शब्दही काढलेला नाही. किंवा ते काम कशा पद्धतीने होतंय हे सुद्धा न पाहावं त्यामुळे वाई नगरपालिकेत खरोखर विरोधी पक्ष अस्तित्वात आहे की सर्वच एकाच भूमिकेत आहेत, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. काही नगरसेवक फक्त नगरपालिकेमध्ये जाऊन बसण्यातच काम करत असल्याचे चित्र दिसत आहे एकही चकार शब्द काढत नाहीत याचा अर्थ जनतेने काय समजायचा
विरोधी पक्षनेत्यांनी जनतेच्या हितासाठी प्रशासनाला जाब विचारणे अपेक्षित असताना त्यांचे मौन अनेक शंका निर्माण करणारे ठरत आहे. "मिळे-जुळे सरकार" अशी चर्चा आता शहरात उघडपणे होऊ लागली असून जनतेचा विश्वास डळमळीत होत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, ज्या ठिकाणी मोठ्या आकाराचे आणि दूरवरून स्पष्ट दिसणारे फलक आवश्यक आहेत, तेथे अत्यंत लहान आकाराचे फलक बसविण्यात आले आहेत. मग या कामाचा आराखडा कोणाच्या मान्यतेने तयार झाला? निकृष्ट साहित्याचा वापर करून खर्च कोणाच्या फायद्यासाठी वाढविण्यात आला? संबंधित ठेकेदारावर कोणाची मेहेरनजर आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. वाईकरांनी शहराच्या विकासासाठी नगरसेवकांना निवडून दिले; मात्र विकासाऐवजी जनतेच्या कररुपी पैशाची उधळपट्टी होत असताना लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या कामांवर मौन धारण करणारे नगरसेवक नेमके कोणाच्या हिताचे राजकारण करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे अशा प्रकारची अनेक निकृष्ट कामे होत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. त्यामुळे महागणपती पुलासह शहरातील सर्व फलकांच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी, संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबविणे ही लोकप्रतिनिधींची घटनात्मक जबाबदारी आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केवळ पदाची मिरवणूक न करता जनहितासाठी आवाज उठवावा, अन्यथा जनतेच्या पैशाची होणारी उधळपट्टी पाहूनही गप्प बसणारे लोकप्रतिनिधी हे जनतेच्या विश्वासाला तडा देत असल्याचेच चित्र अधिक गडद होईल.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



