वाईत अन्न व औषध प्रशासनाचा सलग दुसऱ्या दिवशी 'धडक मोर्चा'!

बेकायदेशीर आणि अस्वच्छ हॉटेल्स, हातगाड्यांचे धाबे दणाणले!

Swift and decisive action, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

कालच बेकायदेशीर दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केल्यानंतर, अन्न व औषध प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी आपला मोर्चा वाई शहरातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांकडे वळवला आहे. या धडक मोहिमेमुळे नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे पुरते दणाणले आहेत. या कारवाईत एकूण २ हॉटेल्स आणि ३ खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर त्रुटी आढळल्याने कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आता आला आहे.

     वाई बस स्थानक परिसरातील सेंट थॉमस हायस्कूल जवळ असलेल्या हॉटेल सम्राट चायनीज, रेड चिली चायनीज आणि शोरमा हाऊस या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक धाडी टाकल्या. तपासणी दरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या ठिकाणी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही अधिकृत तपासणी केलेली नव्हती. तसेच, हॉटेलमध्ये अन्न शिजवणाऱ्या व वाढणाऱ्या कामगारांचे 'मेडिकल रिपोर्ट' गायब होते! किचन आणि परिसरात पेस्ट कंट्रोल केले नसल्याचे आढळले असून, वस्तू खरेदी-विक्रीची अधिकृत बिले देखील मालकांकडे उपलब्ध नव्हती. खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक असणारे 'एप्रोन' आणि 'टोपी' यांचा वापर कामगारांकडून केला जात नसल्याचे रंगेहात पकडण्यात आले.

     बस स्थानक परिसरच नव्हे, तर वाई न्यायालयाच्या आवारातील सम्राट चायनीज आणि मोमोज विला या दोन हातगाड्यांवरही प्रशासनाने आपला मोर्चा वळवला. या दोन्ही ठिकाणी ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळाले. पिण्याच्या पाण्याची तपासणी नाही, कामगारांचे मेडिकल सर्टिफिकेट नाही आणि खरेदी-विक्रीची कोणतीही बिले नाहीत, अशा निष्काळजीपणामुळे या हातगाड्यांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्यात आली.

     ही धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक पथकात धडाडीचे अधिकारी अ. अ. गायकवाड, प्रि. ना. वाईकर आणि ओं. कि. शिंदे यांचा समावेश होता.

     वाई शहर व परिसरात अशा अनेक हातगाड्या आणि हॉटेल्स आहेत, जिथे साधी स्वच्छताही राखली जात नाही. या कारवाईमुळे हॉटेल आणि हातगाड्यांवर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे तेल अत्यंत हलक्या आणि घातक दर्जाचे असल्याच्या चर्चा आता वाईकर नागरिकांमध्ये सुरू झाल्या आहेत. अनेक हॉटेल्समधील किचनची अवस्था तर इतकी बिकट आहे की तिथे पाहिल्यास अन्न खाण्याची इच्छाच मरेल! सामान्यतः ग्राहक चविष्ट आणि चमचमीत जेवणाच्या मोहात पडतात आणि पडद्यामागील अस्वच्छतेकडे त्यांचे दुर्लक्ष होते.

     अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईचे वाईकर नागरिकांमधून जोरदार कौतुक होत आहे. प्रशासनाने या कारवाईत खंड पडू न देता सातत्य ठेवावे, जेणेकरून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांना कायमचा आळा बसेल, अशी ठाम मागणी नागरिकांमधून होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !