श्रीराम स्वाध्याय परिवाराच्या वतीने जाधव यांना पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, सातारा -प्रतिनिधी शुभम कोदे
आयुष्याच्या प्रवासात पुरस्कार अनेक मिळतात, कौतुकाची थापही पाठीवर पडते. पण जेव्हा सन्मान अशा परिवाराकडून होतो, जिथे विचारांना, भावाला आणि समर्पणाला सर्वोच्च स्थान आहे, तेव्हा डोळे आपोआप कृतज्ञतेने ओलावतात. यावर्षी मला 'आदर्श पत्रकारिता' आणि 'गुणवंत कामगार' यांसह विविध क्षेत्रांतील पुरस्कारांनी गौरवण्यात आले, हा माझ्या कामाचा सन्मान होताच. पण, नुकताच श्रीराम स्वाध्याय परिवार, सातारा यांच्या वतीने स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे झालेला माझा सन्मान माझ्यासाठी केवळ एक सन्मान नव्हता, तर ती माझ्या अंतरंगाला समृद्ध करणारी एक भावनिक अनुभूती होती. असे मत महेंद्र जाधव यांनी व्यक्त केले आहे. त्यांना श्रीराम स्वाध्याय परिवाराच्या वतीने पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
पूजनीय श्री रामकृष्ण परमहंस यांच्या विचारातून प्रेरित होऊन संजीवन स्मृतीरूप शरदभाई माणिशंकर जानी यांनी स्थापन केलेला श्रीराम स्वाध्याय परिवार केवळ एक चळवळ नाही, तर माणूस म्हणून जगण्याचा आणि घडण्याचा तो एक वैश्विक मार्ग आहे. जेथे धनापेक्षा धर्माला, वस्तूपेक्षा विचाराला आणि स्वार्थापेक्षा समर्पणाला प्रतिष्ठा दिली जाते, अशा या पवित्र परिवाराने मला आपल्या मायेच्या पदराखाली घेत सन्मानित करावे, यासारखे दुसरे भाग्य नाही.
हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत खास ठरला तो तिथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तींमुळे. कॅनरा बँकेचे निवृत्त व्यवस्थापक बळवंत एकनाथ गायकवाड यांच्या शुभहस्ते जेव्हा माझा सन्मान झाला, तेव्हा एका ज्येष्ठ मार्गदर्शकाचा आशीर्वाद मिळाल्याची भावना मनात दाटून आली.
याप्रसंगी श्रीराम स्वाध्याय परिवार साताराचे संवर्धक व 'वेदपरिवहन फॅसिलिटी अँड कौन्सिलिंग सर्विसेस'चे संचालक वीरेनभाई शरदभाई जानी, 'श्री इस्टेट्स'चे श्रीकांत सच्चीत मुळे (अण्णा), अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी निलेश कुमठेकर आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पूरब दिलीप शहा या सर्वच मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी ही थोर मंडळी जेव्हा माझ्या सन्मानासाठी एकत्र आली, तेव्हा मी खऱ्या अर्थाने कृत्य-कृत्य झालो.
"कृतीपेक्षा वृत्तीला आणि परिणामापेक्षा प्रयत्नाला महत्त्व देणाऱ्या स्वाध्यायी मित्रांनी दिलेली ही शाबासकी, मला भविष्यात अधिक प्रामाणिकपणे आणि समाजाभिमुख राहून पत्रकारिता करण्याची ऊर्जा देऊन गेली आहे."
हा सन्मान केवळ माझा नाही, तर माझ्या लेखणीवर, माझ्या कष्टांवर आणि माझ्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. स्वाध्याय परिवाराने दिलेला हा आदर मी माझ्या शिरावर अत्यंत नम्रपणे स्वीकारतो. या सोहळ्याने मला जाणीव करून दिली आहे की, समाजासाठी घेतलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत. या अथांग मायेबद्दल आणि आदराबद्दल मी श्रीराम स्वाध्याय परिवार, सातारा आणि सर्व मान्यवरांचा आयुष्यभर ऋणी राहीन!
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



