ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांवर सकारात्मक चर्चा
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी वाईच्या कार्यक्षम तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला 'गावभेट दौरा' ओझर्डे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी सायं. ८ वा. येथील पद्मावती देवी समाजमंदिर येथे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि लोकहितार्थ विषयांवर प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
या कार्यक्रमाला तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्यासह वाई पंचायत समितीचे मुख्य अधिकारी नारायण घोलप, पंचायत समिती सदस्या हर्षदा फरांदे आणि विस्तार अधिकारी राहुल हजारे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच ओझर्डेचे उपसरपंच शेखर फरांदे, ओझर्डे सर्कल शीतल अडसूळ, तलाठी धनंजय कांबळे, सर्कल कोळेकर, तलाठी महेश बोडके, तलाठी गणेश गायकवाड आणि ओझर्डेचे कोतवाल महेश गुरव यांच्यासह महसूल व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याला ओझर्डे गावातील नागरिक, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
गावभेट दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध समस्यांवर अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली व तात्काळ मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. गावांतर्गत रस्ते आणि शेतीसाठीचे पांदण रस्ते तातडीने विकसित करण्याबाबत नियोजन, गरजू व हक्काच्या घरापासून वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांना 'घरकुल योजने'चा लाभ मिळवून देण्याबाबत आढावा, गावातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणे आणि नागरिकांना वेळेत वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पशुसंवर्धन विषयक समस्यांवर चर्चा आणि योग्य उपाययोजना. या विषयांवर सकारात्मक चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी म्हणाल्या, "सामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांच्या दारात जाऊन सोडवणे हा या गावभेट दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. ओझर्डे ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व रास्त मागण्यांवर प्रशासन सकारात्मक असून, विकासकामे वेळेत पूर्ण केली जातील."
रात्रीची वेळ असूनही ओझर्डे ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी या बैठकीला लक्षणीय गर्दी केली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट गावात येऊन संवाद साधल्याबद्दल आणि योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल संपूर्ण ओझर्डे ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाचे विशेष आभार मानण्यात आले. एकूणच हा गावभेट दौरा अत्यंत यशस्वी ठरला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



