उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
कौटुंबिक वादातून सख्या भावानेच दुसऱ्या भावावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाई तालुक्यातील मौजे मोहडेकरवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, भुईंज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून २०२६ रोजी रात्री ८.३० ते ९.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी दीपक रामचंद्र बांदल (रा. मोहडेकरवाडी, ता. वाई) याने त्याचा सख्खा भाऊ अजित बांदल यांच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी दीपकने "तुला जिवंत सोडत नाही," अशी धमकी देत अजित यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने ४ ते ५ गंभीर वार केले. या भीषण हल्ल्यात अजित बांदल हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले.
या घटनेप्रकरणी जखमी अजित बांदल यांच्या पत्नी रेणुका अजित बांदल यांनी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार सुरुवातीला आरोपी दीपक बांदल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जखमी अजित बांदल यांची प्राणज्योत मालवली. अजित यांच्या मृत्यूनंतर भुईंज पोलिसांनी या गुन्ह्यात योग्य कलमांची वाढ करून खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
या घटनेमुळे मोहडेकरवाडी आणि वाई परिसरात खळबळ उडाली आहे. भुईंज पोलिसांकडून आरोपी दीपक बांदल याला अटक करण्याची कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. ताटे करत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा![]()



