दुर्गंधी, कचरा, डास-माशांचा उपद्रव; भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार – भाविक संतप्त
शिवशाही वृत्तसेवा, वाई - प्रतिनिधी शुभम कोदे
वाई तालुक्यातील सुरूर येथील प्रसिद्ध धावजी पाटील मंदिर परिसरातील अत्यंत दयनीय परिस्थितीमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येत असताना मंदिर परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप होत आहे. मात्र, दुसरीकडे पार्किंगच्या नावाखाली भाविकांकडून सर्रास पैसे वसूल केले जात असल्याने ही श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेली लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
मंदिर परिसरातील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे या विहिरीच्या शेजारीच प्रसादाची दुकाने असल्याने डास, माशा आणि अस्वच्छतेमुळे भाविकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिर परिसरातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून येथे महाप्रसाद घ्यायचा की आजारपण ओढवून घ्यायचे? असा संतप्त सवाल भाविक विचारत आहेत.
याचबरोबर नारळ फोडण्याच्या जागीच नैवेद्य दाखवला जात असल्याने तेथे भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामुळे एखाद्या भाविकावर कुत्र्यांनी हल्ला केल्यावरच मंदिर व्यवस्थापन जागे होणार का? असा संतप्त सवाल भाविक उपस्थित करत आहेत.
मंदिराच्या पूर्व बाजूस अक्षरशः उकिरड्याचे स्वरूप आले असून मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अशा अस्वच्छ वातावरणात भाविकांना नाक मुठीत धरून दर्शनासाठी जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दुचाकीसाठी १० रुपये आणि चारचाकीसाठी ५० रुपये पार्किंग शुल्क आकारले जात असले, तरी त्या बदल्यात कोणतीही मूलभूत सुविधा दिली जात नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. विशेष म्हणजे पंचक्रोशीतील नागरिकांनाही पार्किंग शुल्कातून सूट दिली जात नसल्याने स्थानिकांमध्येही नाराजीचा सूर उमटत असून व्यवस्थापनाला केवळ 'पैसा' कमवण्यात रस आहे की काय, असा संतप्त सवाल आता भाविक विचारू लागले आहेत.
स्थानिक दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंदिरासाठी अद्याप कोणताही अधिकृत ट्रस्ट स्थापन झालेला नसून त्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या मंदिराची व्यवस्था पुजारी आणि पाटील कुटुंबीयांकडून पाहिली जात असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, वाढत्या तक्रारी आणि भाविकांचा रोष लक्षात घेता मंदिर परिसरात तातडीने स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्थेतील पारदर्शकता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा धर्मादाय आयुक्तांकडे पुराव्यांसह अधिकृत तक्रार दाखल करण्याचा इशारा काही भाविकांनी दिला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



