वाई पाचवड रोडवर भीषण अपघात
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई-सातारा मार्गावर वाकेश्वर-बावधन हद्दीत पहाटेच्या सुमारास अत्यंत व दुर्दैवी झालेल्या भीषण अपघातात वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड हे आपल्या पत्नीसह वाई पाचवड रोडवर प्रवास करत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात श्रावण राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत होते. कर्तव्यदक्ष, धाडसी आणि सर्वसामान्य नागरिकांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे वाई पोलीस दलासह सातारा जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे, तसेच वाई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, संबंधित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने तपास सुरू केला आहे.
श्रावण राठोड यांच्या निधनाने पोलीस दलाने एक कर्तव्यनिष्ठ व धाडसी सहकारी गमावला असून, विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या परिवाराला या मोठ्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा









