कोणत्या जागा कोणाला मिळणार, याचा फैसला आज दुपारपर्यंत - अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप ५, राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि शिवसेना २ असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. दसऱ्याच्या मध्यरात्री तीनही पक्षांच्या नेत्यांनी गुप्त ठिकाणी बैठक घेत या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. त्यामुळे डीसीसी बँकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दसऱ्याच्या मध्यरात्री गुप्त बैठकीत फॉर्म्युल्यावर एकमत
जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. भाजपकडून सुरुवातीला ७–२–१ असा फॉर्म्युला मांडण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून हा प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही. त्यानंतर ६–२–२ या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली; परंतु त्यातूनही तोडगा निघाला नव्हता.
दरम्यान, अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस असल्याने महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार की स्वतंत्र वाटचाल करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. जागावाटपाचा निर्णय न झाल्यास निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष महायुतीच्या अंतिम निर्णयाकडे लागले होते.
अखेर दसऱ्याच्या मध्यरात्री झालेल्या बैठकीत भाजप ५, राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि शिवसेना २ या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचे समजते. त्यामुळे जागावाटपाचा मोठा अडथळा दूर झाला आहे.
कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला?
जागांची संख्या निश्चित झाल्याची माहिती समोर आली असली, तरी नेमक्या कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबतची उत्सुकता कायम आहे. आज दुपारपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोणते उमेदवार माघार घेणार आणि कोण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार, याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
डीसीसी बँकेच्या निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याने महायुतीच्या पुढील राजकीय रणनीतीला आता दिशा मिळणार असून, आजच्या घडामोडींमधून निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
भाजपच्या उमेदवारांना साताऱ्यातच थांबण्याचे आदेश
भाजपच्या वतीने काल मध्यरात्री अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांना साताऱ्यातच थांबण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. जागावाटपानंतर कोणत्या जागेवर कोणत्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर, संबंधित उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी सकाळी ११ ते ११.३० वाजेपर्यंत अर्ज माघारी घ्यावेत, असे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
दिग्गज अर्ज माघारी घेणार? कार्यकर्त्यांना संधी मिळणार?
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता उमेदवारी माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जागावाटपात ज्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, त्यांच्याव्यतिरिक्त इतर उमेदवारांना अर्ज मागे घ्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून दिग्गज नेते माघार घेणार का? नव्या चेहऱ्यांसह कार्यकर्त्यांना संधी मिळणार का? याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











