कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू! महायुतीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार

पिंपरी-चिंचवड आणि भोसरीत पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा उत्साहात संपन्न, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मार्गदर्शन
Teacher constitution election, kaustubh gawade, pimpari Chinchwad, Pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पिंपरी-चिंचवड (फैजल पठाण)
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी कंबर कसली असून, “शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणारे नेतृत्व विधान परिषदेत पाठवण्यासाठी शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करू; त्यासाठी जीवाचे रान करू!” असा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ. स्मिताताई जाधव यांच्या प्रचारार्थ सोमवार, दि. १९ ऑक्टोबर, २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता संत तुकारामनगर, चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात भव्य पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात महायुतीच्या घटक पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय उड्डाण व सहकार राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि शिक्षण क्षेत्राशी बांधिलकी जपणारे नेतृत्व विधान परिषदेत जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कौस्तुभ गावडे यांच्यासारख्या उच्चशिक्षित, अभ्यासू आणि युवा नेतृत्वाला संधी मिळाल्यास शिक्षकांच्या समस्या, प्रलंबित मागण्या आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांना प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना भक्कम पाठबळ देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मेळाव्याचे प्रास्ताविक भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे यांनी केले. भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार श्री. विलास लांडे यांनी दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा विश्वास व्यक्त केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष श्री. कुणाल वावळकर, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर श्री. योगेश बहल आणि शिवसेनेचे गटनेते श्री. विश्वजीत बारणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या वेळी चिंचवडचे आमदार श्री. शंकर जगताप, भोसरीचे आमदार श्री. महेशदादा लांडगे, विधान परिषदेच्या आमदार सौ. उमाताई खापरे, माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन सहसचिव श्री. सीताराम गवळी यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे शिक्षक, प्राध्यापक आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप आणि आमदार उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नगरसेवक, मंडलाध्यक्ष, केंद्राध्यक्ष आणि विविध पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक शिक्षक व पदवीधर मतदारापर्यंत पोहोचून महायुतीच्या उमेदवारांची भूमिका आणि त्यांचा अजेंडा मांडण्यावर भर दिला जात आहे.

शिक्षकांच्या न्याय्य मागण्या, जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित निर्णय आणि शिक्षणव्यवस्थेतील सुधारणा यांसाठी विधान परिषदेत प्रभावी आवाज असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले, शिक्षण क्षेत्राशी निगडित अनुभव असलेले आणि शिक्षकांशी संवाद साधणारे नेतृत्व म्हणून कौस्तुभ गावडे यांच्याकडे पाहिले जात आहे.

महायुतीच्या प्रचाराला विविध शैक्षणिक संस्था, शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, क्रीडा शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक-शिक्षकेतर ओबीसी संघटनांकडून पाठिंबा मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. डी. वाय. पाटील शिक्षण समूह, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि एमआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा मिळत असल्याचाही उल्लेख करण्यात आला.

विजयाचा निर्धार; कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १!
पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरात प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, हा उत्साह प्रत्यक्ष मतदानात रूपांतरित करण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि मतदानाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक असल्याची जाणीव पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

“हा केवळ निवडणुकीचा प्रचार नाही, तर शिक्षकांच्या हक्कांचा, सन्मानाचा आणि उज्ज्वल शैक्षणिक भविष्याचा लढा आहे. कौस्तुभ गावडे सरांना विधान परिषदेत पाठविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. घरोघरी, शाळाशाळांत आणि प्रत्येक शिक्षक मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू!” असा ठाम निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. तसेच या निवडणुकीत शिक्षक मतदारांनी शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ देऊन विजयी करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !