पंढरपुरात गुरुवारी रंगणार दिमाखदार सोहळा!
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर - मनिषा कुलकर्णी
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, साहित्य, पोलीस, संरक्षण आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यासाठी 'शिवशाही न्यूज नेटवर्क'च्या वतीने 'शिवशाही महारत्न पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता श्रीराम मंगल कार्यालय (दूध पंढरी शेजारी, इसबावी, पंढरपूर, जि. सोलापूर) येथे हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.
राज्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून, आपापल्या क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या १५ गुणवंत व्यक्तींना या प्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारार्थी व त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा लेखाजोखा:
वैद्यकीय व सामाजिक क्षेत्र:
मा. मंगेश चिवटे (वैद्यकीय):
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षा'च्या माध्यमातून राज्यातील हजारो गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मिळवून दिल्याबद्दल त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे.
मा. डॉ. सुनिता पोटे (आरोग्य):
शिरूर नगर परिषदेच्या नगरसेविका व पाणीपुरवठा सभापती म्हणून कार्य करत असतानाच पतीच्या साथीने मोफत व अल्प दरात वैद्यकीय सेवा दिली. रस्त्यावर प्रसुती वेदनेने कासावीस झालेल्या महिलेची यशस्वी प्रसुती करून त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेची दखल घेत हा गौरव केला जात आहे.
मा. ॲड. संदीप वाघ (समाज सेवा):
प्रतिकूल परिस्थितीतून उद्योग उभा केल्यानंतर समाजाचे देणे लागण्याच्या भावनेतून शाळांना आर्थिक मदत, 'माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमात योगदान आणि वृद्धांसाठी 'विरंगुळा कट्टा' संकल्पना राबवून केलेल्या समाजसेवेबद्दल हा सन्मान दिला जात आहे.
कृषी व तंत्रज्ञान संशोधन:
मा. डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात (संशोधन):
कृषी मृदा शास्त्रात (Agricultural Soil Science) पीएच.डी. मिळवून गेल्या नऊ वर्षांपासून शेतकऱ्यांना मोफत व अचूक माती परीक्षण मार्गदर्शन करून पिकांचे उत्पन्न वाढवण्यात मोठे योगदान दिल्याबद्दल संशोधन क्षेत्रातील पुरस्कार.
मा. सविता मुळीक (कृषी):
निसर्गाचा लहरीपणा व संकटांवर मात करत जिद्दीने डाळिंब आणि सीताफळाची यशस्वी शेती फुलवून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा दिल्याबद्दल कृषी क्षेत्रातील पुरस्कार.
मा. धनाजी बापू देशमुख (कृषी सेवा):
'भगवंत कृषी उद्योग'च्या माध्यमातून केवळ खते-औषधांची विक्री न करता, नफा-तोट्याचा विचार न करता बळीराजाला योग्य मार्गदर्शन व सेवा पुरवल्याबद्दल कृषी सेवा पुरस्कार.
शिक्षण, साहित्य व संस्कृती:
मा. वैशाली वाघमारे (शैक्षणिक):
गेल्या २६ वर्षांपासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी न ठेवता त्यांच्यातील कलागुणांना वाव देऊन आदर्श नागरिक घडवल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार.
मा. ईश्वरप्रसाद रितापुरे (शिक्षण संशोधन):
शासकीय फार्मसी कॉलेज, कराड येथे २५ वर्षे अध्यापन, NSS माध्यमातून जलसंधारण व वृक्षारोपण, पुस्तकांचे लेखन आणि महाविद्यालयाला 'A+' ग्रेड मिळवून देण्यात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सन्मान.
मा. डॉ. भारत गायकवाड (साहित्य):
तंत्रज्ञानाच्या युगात साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करून लेखणीच्या जोरावर माणूसपण जपण्याचे कार्य केल्याबद्दल साहित्य पुरस्कार.
मा. प्रा. डॉ. तानाजीराव माने (साहित्य):
संत साहित्याची परंपरा पुढे नेत समाजमनाचे वास्तव प्रतिबिंब साहित्यातून मांडून सामाजिक प्रश्नांवर सुलभ भाष्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार.
पोलीस, संरक्षण व डिजिटल मीडिया:
मा. दशरथ वाघमोडे (पोलीस सेवा):
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य जपत विनम्र स्वभाव आणि हसतमुख चेहऱ्याने 'गुड पोलिसिंग'चा आदर्श निर्माण केल्याबद्दल पोलीस सेवा पुरस्कार.
मा. संजय चौधरी (संरक्षण):
भारतीय नौदलात INS विराट आणि INS किरपानवर तब्बल २५ वर्षे अखंड देशसेवा बजावून निवृत्तीनंतरही कार्यरत राहिल्याबद्दल संरक्षण क्षेत्रातील पुरस्कार.
मा. रणजीत यादव (सोशल मीडिया):
सोशल मीडियाचा वापर समाजप्रबोधन, राजकीय-सामाजिक विश्लेषणाचा अभ्यासपूर्ण मांडणीसाठी करून इतिहासातील घटनांचे वास्तववादी विवेचन केल्याबद्दल सोशल मीडिया क्षेत्रातील पुरस्कार.
उद्योग, विशेष सन्मान व आदर्श दांपत्य:
मा. विठ्ठल जिद्दीमणी (युवा उद्योजक): वाईसारख्या छोट्या शहरातून 'वाई बिझनेस प्रो' ही हायपरलोकल डिजिटल इकोसिस्टम उभी करून स्थानिक व्यावसायिक, कामगार व रिक्षाचालकांसाठी रोजगाराचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल युवा उद्योजक पुरस्कार.
मा. पार्वती ताई आवताडे (आदर्श माता): पतीच्या निधनानंतर खचून न जाता मुलांना योग्य संस्कार देऊन घडवले. त्यांचे चिरंजीव आमदार समाधान अवताडे यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या त्यांच्या मातृत्वाला 'शिवशाही महारत्न आदर्श माता' पुरस्काराने वंदन करण्यात येत आहे.
मा. सौ. सविता व रवि सोनार (आदर्श पती-पत्नी): २६ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात एकमेकांना खंबीर साथ देत वृद्धाश्रम, बालकाश्रम व अंधशाळांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श दांपत्य म्हणून गौरव.
उपस्थित राहण्याचे आवाहन
पंढरपूर व परिसरातील सर्व नागरिक, पत्रकार, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





















