बैलांपेक्षा डॉल्बीचा गजर अन् तळीरामांचा धिंगाणा; वाईच्या सांस्कृतिक परंपरेवर प्रश्नचिन्ह
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पेढा रेडा ठरला वाईच्या मिरवणूकीचा आकर्षण
वाई शहरासह तालुक्यात सोमवारी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र बैलांच्या पूजनाचा आणि शेतकरी संस्कृतीचा हा सण अनेक ठिकाणी डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात आणि मद्यधुंद तरुणांच्या धांगडधिंग्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही भागात पारंपरिक पद्धतीने मिरवणुका निघाल्या असल्या तरी बहुतांश ठिकाणी डॉल्बीवर बेभान होऊन नाचण्यातच तरुणाईने धन्यता मानल्याची चर्चा रंगली.
दिवसभर रिमझिम पावसाची संततधार सुरू असतानाही शेतकरी बांधवांनी आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांना पिवडी, रंगीबेरंगी नक्षीकाम, आकर्षक शिंगांची सजावट, फुलांचे हार, घुंगरमाळा आणि विविध पारंपरिक साज चढविण्यात आले. त्यानंतर गावोगावी ढोल-ताशे व पारंपरिक वाद्यांच्या गजरात बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र या उत्सवात बैलांपेक्षा डॉल्बी आणि नाचणाऱ्या तळीरामांचाच बोलबाला असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.
यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते. बैलांना सजविण्यासाठी बाजारपेठेत घुंगरमाळा, चाळ, कासरे, शिंगांसाठी शेंब्या, तोरणे आणि इतर सजावटीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. मात्र पूर्वीच्या पारंपरिक झुली आणि पारंपरिक साज हळूहळू इतिहासजमा होत असून त्यांच्या जागी आधुनिक सजावटीच्या साहित्याने स्थान मिळविल्याचे चित्र दिसून आले.
तालुक्यातील पसरणी, बावधन, ओझर्डे, खानापूर, बोपेगाव, कवठे, भुईंज, बोपर्डी आदी गावांमध्ये बैलांच्या आकर्षक मिरवणुका काढण्यात आल्या. वाई शहरातील सिद्धनाथवाडी, सोनगीरवाडी, फुलेनगर, शाहबाग, गंगापुरी-नावेचीवाडी, रविवार पेठ, ढगे आळी तसेच इतर भागांतून सजविलेल्या बैलजोड्या मिरवणुकीने किसनवीर चौकात दाखल झाल्या. शेकडो नागरिकांनी या मिरवणुकांचा आनंद घेतला. चौकांमध्ये फुग्यांची दुकाने, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि उत्सवी वातावरणामुळे शहराला जत्रेचे स्वरूप आले होते.
काही मिरवणुकांमध्ये अवघे दोन ते पाच बैल असताना डॉल्बीचा आवाज मात्र कानठळ्या बसवणारा होता. विशेष म्हणजे अनेक तरुण डॉल्बीवर चढून बेभान होऊन नाचत होते. काही जण मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत असल्याचेही चित्र पाहायला मिळाले. मोठ्या आवाजामुळे बैल सैरभैर होत होते, तर त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी मालकांची मोठी धावपळ सुरू होती. मात्र या उत्सवावर डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने पाणी फेरल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
काही ठिकाणी अपवाद वगळता मिरवणुका डॉल्बीविरहित पारंपरिक पद्धतीने निघाल्या. मात्र बैलांच्या शांततेच्या आणि पूजनाच्या या सणाचे रूपांतर डॉल्बी स्पर्धेत झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. तर मुक्या जनावरांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची भावना उपस्थित प्राणीप्रेमी आणि नागरिकांनी व्यक्त केली.
बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर वाई पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रदिप सूर्यवंशी यांनी आयोजकांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था, ध्वनीप्रदूषण आणि शांततेबाबत आवश्यक सूचना दिल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी या सूचनांना हरताळ फासल्याचे चित्र दिसून आले. डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा मद्यधुंद तरुणांना रोखण्यासाठी प्रभावी पोलिसी हस्तक्षेप दिसून न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
यांत्रिकीकरणामुळे शेतीत ट्रॅक्टरसारख्या यंत्रांचा वापर वाढला असला तरी ग्रामीण भागात आजही अनेक शेतकरी बैलांच्या मदतीने शेतीची कामे करतात. मात्र बैलांची वाढती किंमत, चारा, औषधोपचार आणि देखभालीचा वाढलेला खर्च यामुळे बैलांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण जपण्याऐवजी त्याचे 'डॉल्बी महोत्सवात' रूपांतर होत असल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. मुक्या जनावरांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करून सुरू असलेला हा धांगडधिंगा पाहून, "खरंच हा बेंदूर सण बैलांचा, तळीरामांचा की डॉल्बीचा?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.
बेंदूर हा केवळ उत्सव नसून शेतकऱ्याच्या जीवनातील कृतज्ञतेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मात्र परंपरेपेक्षा डॉल्बी, मद्यधुंद नृत्य आणि धांगडधिंगा यांनाच अधिक महत्त्व मिळत असल्याचे यंदाच्या सणातून दिसून आले. "भावी पिढीला आपण हाच वारसा देणार आहोत का?" असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत असून, परंपरेचे जतन करण्यासाठी प्रशासन, आयोजक आणि समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
यंदाच्या मिरवणुकीत आकर्षक सजावटीतील 'पेढा' या रेड्याने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रुबाबदार चाल, देखणी सजावट आणि दिमाखदार उपस्थितीमुळे या रेड्याभोवती नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी त्याच्यासोबत छायाचित्रे काढत त्याचे कौतुक केले. त्यामुळे यंदाच्या बेंदूर मिरवणुकीत 'पेढा' या रेड्याने वेगळाच भाव खाल्ल्याची चर्चा सुरू होती.
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





















