आमदार समाधान आवताडे यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा,पंढरपूर- मंगळवेढा/प्रतिनिधी
पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा काळ उलटला तरी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्यामुळे या दोन्ही तालुक्यांवर दुष्काळाचे सावट पसरले असून खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. काही भागांत तर पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन, भीमा आणि निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी कॅनॉलद्वारे सोडून मतदारसंघातील सर्व तलाव, ओढे आणि नाले भरून देण्याची आग्रही मागणी केली आहे.
एनआरबीसीच्या माध्यमातून तलाव भरण्याची विनंती
सध्या उजनी धरणातून कॅनॉलला पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे 'एनआरबीसी' (निरा-भाटघर) अंतर्गत नीरा नदी पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. त्यामुळे एनआरबीसीमधून रांझणी तलावापासून मतदारसंघातील कासेगाव, कोर्टी, गादेगाव, बोहाळी तलाव, ७ नंबर फाटा या परिसरासह तालुक्यातील सर्व साठवण तलाव, पाझर तलाव, छोटे-मोठे नाले आणि तिसंगी येथील साठवण तलाव तातडीने भरून द्यावेत, अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली.
उजनीचे पाणी पूर्ण दाबाने सोडण्याचे निर्देश देण्याचे आवाहन
उजनी धरणातून सध्या भीमा नदी आणि कॅनॉलला पाणी सोडण्यात आले असले, तरी कॅनॉलमधील पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे हे पाणी पूर्ण दाबाने सोडण्यात यावे, अशी विनंती त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली. मंगळवेढा तालुक्यातील नंदूर, बोराळे, कर्जाळ, कात्राळ, हुलजंती टेल भागासह संपूर्ण मतदारसंघातील ओढे-नाले व पाझर तलाव, तसेच पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गादेगावपर्यंतचे साठवण तलाव व नाले पूर्ण क्षमतेने भरून देण्यासंदर्भात जलसंपदा विभागाला त्वरित सूचना द्याव्यात, अशी आग्रही मागणी आमदार समाधान आवताडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





















