वारकरी संप्रदायातील 'काका-पुतण्या'च्या पवित्र नात्याची आठवण
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस - प्रतिनिधी वैभव कुलकर्णी
पंढरीच्या वारीत विठ्ठलनामाचा गजर करत निघालेल्या संतश्रेष्ठ कान्हुराज महाराज (केंदूरकर) यांच्या पालखी सोहळ्याचे १८ जुलै २०२६ रोजी शिंदेवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे सायंकाळी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन होत आहे. वारकरी संप्रदायातील एक थोर सिद्धपुरुष आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे अत्यंत जवळचे नाते असलेल्या या संताच्या स्वागतासाठी शिंदेवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
संत ज्ञानेश्वरांचे 'काका':अलौकिक नाते
संत कान्हुराज महाराज हे केवळ वारकरी संप्रदायातील एक थोर संत नव्हते, तर ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे अतिशय जवळचे आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व होते. ज्ञानेश्वर महाराज त्यांना अत्यंत आदराने 'काका' असे संबोधत असत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा समाधी घेतली, तेव्हा नामदेवरायांना झालेली व्याकुळता पाहून सर्व संतांच्या आग्रहास्तव संत कान्हुराज महाराजांनीच ज्ञानेश्वरांच्या समाधीचे कीर्तन केले होते, अशी आख्यायिका आहे. त्यांच्यातील हा 'काका-पुतण्या'चा पवित्र आणि आध्यात्मिक बंध आजही वारकरी परंपरेत आदराने सांगितला जातो.
शिंदेवाडीत उत्साहाचे वातावरण
या थोर संतांची पालखी शिंदेवाडीत येत असल्यामुळे संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. १८ जुलैच्या सायंकाळी पालखीचे आगमन होताच, गावाच्या प्रवेशद्वारावर पारंपरिक वाद्यवृंद, फुलांची उधळण आणि टाळ-मृदंगाच्या गजरात महाराजांचे जंगी स्वागत होणार आहे.
ग्रामस्थांचा सेवाभाव
पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी ग्रामपंचायत शिंदेवाडी आणि समस्त ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. दिंड्या मुक्कामासाठी शिंदेवाडीतील शाळा व गणेश मंदिर या ठिकाणी थांबून विश्रांती घेतात. वारकऱ्यांच्या स्वागताची उत्तम तयारी करण्यात आली आहे. "संतसेवा हीच ईश्वरसेवा" मानून गावातील प्रत्येक कुटुंब दरवर्षी या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने स्वतःला झोकून देत असते. पालखी मार्ग स्वच्छ करून आकर्षक रांगोळ्या काढून , गावातील वातावरण मंगलमय होणार आहे.
शिंदेवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की, १८ जुलै रोजी सायंकाळी होणाऱ्या या पालखी आगमनाच्या सोहळ्यात आणि त्यानंतरच्या कीर्तनरूपी ज्ञानामृतात सहभागी होऊन संत कान्हुराज महाराजांचे संत दर्शनाचा व आरतीचा लाभ घ्यावा . हा सोहळा आपल्या गावासाठी अत्यंत भाग्याचा आणि चैतन्यदायी ठरणार आहे. साक्षात संतश्रेष्ठ श्री कान्हुराज महाराजांच्या रूपाने, आपणास माऊलींचे दर्शन घडणार आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



