उर्वरित कामासाठी निधी, जागा आणि तांत्रिक अडचणींचे आव्हान
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या २२ कोटी ८४ लाख ३९ हजार ३९३ रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३५ टक्के काम अद्याप बाकी आहे. हा प्रकल्प स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत मंजूर झाला असून, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून ४ मार्च २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. प्रत्यक्ष कामास जुलै २०२४ मध्ये सुरुवात झाली.
या प्रकल्पाचे काम मिरल इन्फ्रास्ट्रक्चर, अहमदाबाद (गुजरात) ही कंपनी करत आहे. सोनगीरवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्लांटचे फाउंडेशन साधारण १७ ते १८ फूट खोल असल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाने दिली.
शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी ६ इंच ते ४ फूट व्यासाच्या पाइपलाइनचे जाळे उभारण्यात येणार असून, त्याचे डिझाइन CPHEEO (Central Public Health and Environmental Engineering Organisation) च्या निकषांनुसार तयार करण्यात आले आहे.
मात्र, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर अनेक प्रश्नचिन्हेही उपस्थित झाली आहेत. मूळ आराखड्यानुसार नावेचीवाडी येथून कामाची सुरुवात अपेक्षित असताना, त्या भागाला खड्डा दाखवून मधल्याळी परिसरातून काम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कृष्णा नदीच्या दोन्ही बाजूंना म्हणजे सोनगीरवाडी आणि रविवार पेठ स्मशानभूमी परिसरात एसटीपी प्रकल्पासाठी आरक्षण आहे. सोनगीरवाडी येथील वनारसे यांच्या जागेचा ताबा पालिकेला मिळाला आहे. मात्र, रविवार पेठ येथील नेवसे यांच्या जागेचा ताबा अद्याप तांत्रिक कारणांमुळे मिळालेला नाही. ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ती मिळाल्यानंतर भुयारी गटार योजना व दुसरा एसटीपी प्रकल्प मार्गी लागेल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
पालिकेच्या म्हणण्यानुसार, रविवार पेठ येथे नवीन एसटीपी प्रकल्प उभारल्यास सांडपाणी उचलण्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च टाळता येणार असून, भविष्यात शहराची सांडपाणी व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांचे गंभीर आरोप
"प्रशासकीय काळात झालेल्या चुकीच्या निर्णयांची चौकशी करण्यासाठी सीए नेमला असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. एसटीपी प्रकल्पासाठी आम्ही हरित लवादापर्यंत गेलो. सर्व विभागांच्या आवश्यक एनओसी घेतलेल्या नाहीत. टाउन प्लॅनिंग विभागाची परवानगीही नाही. उभारण्यात येत असलेल्या एसटीपी प्लांटला भक्कम बेस नसल्याचा आमचा आरोप आहे. नावेचीवाडी खड्ड्यात दाखवून तेथून पाइपलाइन न नेता साठे मंगल परिसरातून काम सुरू करण्यात आले. फक्त प्लांट उभारून बिले काढायची का? याबाबत ठेकेदाराकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही. पालिकेकडे साडेआठ कोटी रुपयांची तरतूद झाल्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. प्रशासकीय काळात कन्सल्टंटला ६० लाख रुपये देण्यात आले, मग उर्वरित सात कोटींचा निधी का मंजूर करून आणला नाही? यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचेही मार्गदर्शन घेतले आहे."
– नगराध्यक्ष अनिल सावंत
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



