पक्क्या रस्त्याची आणि पुलाची मागणी; प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची ग्रामस्थांची आग्रही हाक
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जोर गावातील 'धनगरवस्ती'चा मुसळधार पावसामुळे बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे वस्तीकडे जाणारे दोन्ही ओढे दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी, नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद झाली असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
धनगरवस्तीपर्यंत जाण्यासाठी सध्या केवळ कच्चा आणि खडीचा रस्ता उपलब्ध आहे. यामुळे वस्तीवरील ग्रामस्थांना मुख्य गावात जाण्यासाठी तब्बल दोन ओढे पार करावे लागतात. सध्या हे दोन्ही ओढे ओसंडून वाहत असल्याने वस्तीचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अशा परिस्थितीत एखाद्या वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगासाठी किंवा अत्यावश्यक कामांसाठीही बाहेर पडणे ग्रामस्थांसाठी अत्यंत धोकादायक आणि जीवघेणे बनले आहे.
भातशेतीचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे केवळ संपर्कच तुटला नाही, तर परिसरातील भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उभी पिके कुजून जाण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरवर्षीचे मरण; प्रशासनाने डोळे उघडावे
"या वस्तीमध्ये मूलभूत सुविधांचा कायमच अभाव राहिला आहे. दरवर्षी पावसाळा आला की आमच्या नशिबी हेच हाल येतात. प्रशासनाने आतातरी डोळे उघडावेत आणि आमच्या समस्या कायमच्या मार्गी लावाव्यात," अशी संतप्त आणि आर्त भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. धनगरवस्तीतील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात अशाच भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन धनगरवस्तीपर्यंत पक्का डांबरी रस्ता तयार करावा आणि ओढ्यांवर पूल उभारावा, अशी आग्रही मागणी आता जोर-धनगरवस्तीच्या वतीने करण्यात येत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



