वाई पालिकेचा निर्लज्जपणा - जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदाराला सभागृहात मुदतवाढीच्या - पायघड्या

'दुष्काळात तेरावा महिना'! २४ तास पाणी योजनेच्या नावाखाली वाईतील रस्ते उद्ध्वस्त 

Roads destroyed,Satara, wai , shivshahi news.

शिवशाही  वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

धोम धरणातून वाई शहरासाठी मंजूर झालेल्या २४ तास पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली संपूर्ण वाई शहराची पुरती वाट लागली आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित असताना, उलट संपूर्ण शहर खड्ड्यात घालणाऱ्या ठेकेदाराला पालिकेच्या विशेष सभेमध्ये कोणतीही विचारणा न करता 'बिनशर्त मुदतवाढ' देण्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. ठेकेदाराला धारेवर धरून जाब विचारण्याऐवजी, पालिकेतील सत्ताधारी-विरोधक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून त्याला थेट पायघड्या अंथरल्याने वाईकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

     ठेकेदाराने पाईपलाईनसाठी शहरात जागोजागी मोठमोठे खड्डे खणून ठेवले आहेत. अनेक ठिकाणी हे खड्डे अर्धवट आहेत, तर काही ठिकाणी पाईपलाईन टाकल्यानंतर ते नीट न बुजवल्यामुळे पहिल्याच पावसात हे रस्ते खचले आहेत. आधीच शहरात बंदिस्त गटारांच्या ढिसाळ कामामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाही, त्यातच या खोदलेल्या रस्त्यांची भर पडल्याने वाईकरांसाठी हा 'दुष्काळात तेरावा महिना' ठरत आहे.

     या योजनेचे काम करताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन तुटले आहेत. नियमानुसार हे नळ कनेक्शन तातडीने जोडून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना, चार-चार दिवस उलटूनही कोणतीही दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, पालिकेचे कर वेळेवर भरूनही वाईकरांना पिण्याचे आणि वापराचे पाणी महागड्या दराने विकत घ्यावे लागत आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना हा नाहक आर्थिक भुर्दंड का सोसावा लागत आहे? असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.

     विशेष सभेमध्ये ठेकेदाराला कामाला उशीर का झाला? जनतेला नाहक त्रास का दिला? असे प्रश्न विचारून त्याला काळ्यशार यादीत टाकणे गरजेचे होते. मात्र, वाई पालिकेच्या सभागृहात उलटीच गंगा पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे वगळता उपस्थित सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी ठेकेदाराला उलट 'काम कसे करावे' याचे सल्ले देत, त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता थेट मुदतवाढ मंजूर केली. या अभद्र युतीमुळे "नगरसेवक जनतेचे प्रतिनिधी आहेत की ठेकेदाराचे पार्टनर?" असा रोकडा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

रस्त्यांवरील या जीवघेण्या खड्ड्यांमुळे रोज लहान-मोठे अपघात होत आहेत. एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच हे सुस्त प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का? पालिकेने नेमलेल्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांचा वचक का नाही? त्याला पाठीशी घालण्यामागे नक्की कोणाचे 'आर्थिक' हितसंबंध दडले आहेत? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून यानिमित्त विचारले जात आहेत 

     शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास पाणी पुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे, यात शंकाच नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने वाई शहराचा ‘नर्क’ करून ठेवला आहे. ही मनमानी आता सहन केली जाणार नाही. पालिकेने या ठेकेदाराकडून तातडीने रस्ते दुरुस्त करून घ्यावेत आणि हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून वाईकरांची या मरणयातनेतून लवकरात लवकर सुटका करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा संतप्त वाईकर नागरिकांनी दिला आहे.

     -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !