ऐन पावसाळ्यात पूल बांधायची बुद्धी कुणाची - वाईकरांचा संतप्त सवाल

वाईतील पूल दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार रडारवर!

The bridge was washed away, havy rain, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई शहरातील फुलेनगर परिसरातील किवरा ओढ्यावर अवघ्या महिनाभरापूर्वी उभारण्यात आलेला पर्यायी पूल रविवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसात अक्षरशः वाहून गेला. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या पुलाचे एवढ्या कमी कालावधीत झालेले नुकसान पाहता संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पावसाच्या वाढत्या प्रवाहात पूल पूर्णपणे वाहून गेल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली. नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. "महिनाभरही टिकू न शकणारा पूल नेमका कोणत्या दर्जाचा होता?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

घटनेनंतर भाजपचे तेजस जमदाडे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रणित मोरे यांनी संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट आणि ठिसूळ कामावर जोरदार टीका केली. सार्वजनिक पैशातून करण्यात आलेल्या कामांची तातडीने तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर पर्यायी पूल उभारण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कामाच्या वेळेबाबत कोणतीही खबरदारी घेतली नसल्याची टीका नागरिक करत आहेत. "ऐन पावसाळ्यात पूल वाहून गेल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार हे सामान्य माणसालाही समजू शकते; मग लोकप्रतिनिधींना ते का जाणवले नाही?" असा संतप्त सूर परिसरातून उमटत आहे.

या घटनेमुळे निकृष्ट दर्जाची सार्वजनिक कामे, त्यावरील देखरेख आणि जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधित विभागाने केवळ पंचनामा न करता दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

'पर्यायी पूल वाहून गेला' ही अफवा; प्रत्यक्षात वाहतूक आधीच बंद, भराव काढून पाण्याला वाट देण्यात आली - स्थानिक लोकप्रतिनिधींचा खुलासा

वाई शहरातील फुलेनगर परिसरातील किवरा ओढ्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्याची चर्चा आणि काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत सविस्तर खुलासा करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

लोकप्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, किवरा ओढ्यावरील मुख्य पुलाचे काम भोर बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून, मूळ पुलाच्या कामासाठी पर्यायी पूल उभारण्यात आला होता. मात्र, बुधवार (१ जुलै)पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ३ मधील स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी शुक्रवार (३ जुलै) रोजी रात्रीच संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने पर्यायी पुलाकडे जाणारा चर खोदून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच शनिवार (४ जुलै)पासून जुन्या पुलावरून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

रविवार (५ जुलै) रोजी दुपारी पाण्याची पातळी आणखी वाढू लागल्याने पुन्हा संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून जेसीबीच्या सहाय्याने पर्यायी पुलाच्या एका बाजूचा भराव काढण्यात आला. त्यामुळे पाण्याला नैसर्गिक मार्ग मिळाला. सदर पर्यायी पूल वाहून गेलेला नसून, पाण्याचा अडथळा होऊ नये म्हणून नियोजनपूर्वक भराव काढण्यात आल्याचा दावा लोकप्रतिनिधींनी केला आहे.

याशिवाय, पावसाळा संपेपर्यंत किवरा ओढ्यावरील पुलाचे काम सुरू करू नये, यासाठी वाई नगरपालिकेने भोर बांधकाम विभागाशी पत्रव्यवहारही केल्याची माहिती देण्यात आली.

स्थानिकांच्या मते, हा पूल अत्यंत जुना असून त्याच्या पुनर्बांधणीचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे पावसाळा संपताच हे काम गतीने पूर्ण करून नागरिकांची कायमस्वरूपी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पर्यायी पूल वाहून गेल्याच्या चर्चांबाबत नागरिकांनी कोणत्याही इतर माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !