देशी पिस्तूल, जिवंत काडतूससह १.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
कास रस्त्यावरील सांबरवाडी येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दुचाकी व दोन मोबाईल असा १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रेयश दशरथ जाधव (वय २०, रा. रविवार पेठ, सातारा) असे आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर कास परिसरातील धबधबे, घाटमाथा व नदीकाठच्या भागात पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सातारा तालुका पोलिसांकडून सांबरवाडी येथे नाकाबंदी सुरू होती. मंगळवारी (दि. ७) सायंकाळी सुमारे ४.५० वाजता मास्क लावून एमएच-११ ईबी-१२३९ क्रमांकाच्या दुचाकीवरून जाणाऱ्या संशयिताला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने नाकाबंदी तोडून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने नाव, परवाना व वाहनाची कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ केल्याने संशय बळावला. पंचांसमक्ष दुचाकीची झडती घेतली असता डिकीत एक सिल्वर रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दोन मोबाईल हँडसेट आणि दुचाकी असा एकूण १.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, मुजावर, चंद्रहार पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, सोनू शिंदे तसेच पो. ह. मालोजी चव्हाण, रायसिंग घोरपडे आणि अजित निकम यांनी सहभाग घेतला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



