ब्लॅक ड्रॅगन अकॅडमीच्या खेळाडूंची पदकांची लयलूट; सुवर्णासह ६ पदकांची कमाई
अहिल्यानगर येथे ३ ते ५ जुलै २०२६ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ मध्ये सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या १३ खेळाडूंनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी सहा खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई करत साताऱ्याचा झेंडा राज्यभर फडकावला.
अकॅडमीचे संचालक विशाल आबासाहेब कुमठे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आकांक्षा बनसोडे हिने सुवर्णपदक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अद्वैत परामणे, शौर्य शेंडगे आणि तृषा धनावले यांनी रौप्यपदकांवर नाव कोरले, तर आयुष सपकाळ आणि मनस्वी पिसाळ यांनी कांस्यपदक मिळवत जिल्ह्याचा गौरव वाढविला.
स्पर्धेत मंजुषा गायकवाड, प्राची बेलोशे, श्रुती कदम, अनवित जगताप, आरोही केलगणे, अथर्व जगताप आणि दिव्या बनसोडे यांनीही पदक हुकले असले तरी आपल्या दर्जेदार खेळाने उपस्थितांची दाद मिळवली.
या यशाबद्दल बोलताना संचालक विशाल कुमठे म्हणाले, "ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये अफाट क्षमता आहे. योग्य तांत्रिक प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि पालकांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यास हे खेळाडू राज्याबरोबरच राष्ट्रीय स्तरावरही निश्चितच मोठे यश मिळवतील. आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये साताऱ्याचे नाव उज्ज्वल करण्याचे आमचे लक्ष्य आहे."
या यशामागे सहकारी प्रशिक्षक विष्णू खोत, रिद्धी शिरसागर आणि प्रेमजीत चव्हाण यांचे तांत्रिक मार्गदर्शन तसेच पालक प्रतिनिधी स्वाती परामणे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे अकॅडमीतर्फे सांगण्यात आले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सातारा जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



