कोरोना सर्व्हेच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या टोळीला ३ वर्षे सक्तमजुरी

सातारा जिल्हा न्यायालयाचा धडाकेबाज निकाल; पाचही आरोपींना ठोकली बेड्या

Gang that robbed a senior citizen arrested, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

कोरोना संकटाचा गैरफायदा घेत, सर्व्हेच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून पिस्तूल आणि क्लोरोफॉर्मचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने आज जोरदार दणका दिला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी या पाचही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची कडक शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक महिना साधी कैद भोगावी लागणार आहे. न्यायालयाने संवेदनशील निर्णय घेत, दंडाच्या एकूण रकमेतून १० हजार रुपये तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही दिले आहेत.

     ही घटना २८ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी दीडच्या सुमारास सातारा शहरातील रविवार पेठ भागात घडली होती. महेंद्र रामदास मारणे, सोमनाथ अंकुश सातव, युवराज उर्फ योगराज यशवंत शिंदे, रुपाली दत्तात्रय टेमगिरे आणि गोविंद रामदास मारणे या पाच जणांनी मिळून हा कट रचला होता. रविवार पेठेतील रहिवासी श्रीकांत विठोबा बिल्लमपल्ली (वय ६९) हे घरात असताना, आरोपींनी कोरोना सर्व्हे करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. आरोपींनी लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी डॉक्टरांचा अ‍ॅप्रन घातला होता, तसेच सोबत पिस्तूलसदृश एअरगन आणि क्लोरोफॉर्मची बाटलीही आणली होती.

     सर्व्हेच्या बहाण्याने आधी दोघांनी घरात प्रवेश करून माहिती घेण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच त्यांचे इतर साथीदारही आत घुसले. एका आरोपीने बिल्लमपल्ली यांना जोराचा धक्का देऊन सोफ्यावर पाडले आणि त्यांचे तोंड व गळा दाबून धरला. याच वेळी दुसऱ्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रुपये किमतीची २१.४२० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने ओरबाडून घेतली आणि आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

     या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब एस. कदम यांनी अत्यंत कौशल्याने करत आरोपींना गजाआड केले आणि न्यायालयात पक्के दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन मुके यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांनी न्यायालयात एकूण ७ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शींची साक्ष, परिस्थितीजन्य पुरावे आणि पोलिसांचा अचूक तपास ग्राह्य धरून न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी पाचही आरोपींना दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली.

     या खटल्यात सातारा शहर पोलीस ठाण्याचे पैरवी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव, अमित भरते आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मोटे यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायालयाच्या या निकालानंतर साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

   -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !