उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव येथे बी.बी.एफ. (ब्रॉड बेस फरो) तंत्रज्ञानावर आधारित सोयाबीन उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ठिबक सिंचन, सौरऊर्जा आणि बी.बी.एफ. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करण्यावर या मेळाव्यात विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनिल खत्री होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संग्राम पाटील, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, कृषी अधिकारी अमृत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रगतशील शेतकरी तथा कृषीभूषण अनंत माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनिल खत्री यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रूफटॉप सोलर योजना, ठिबक सिंचन आणि ऑटोमेशनचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याची गरज अधोरेखित केली. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर होईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. संग्राम पाटील यांनी बी.बी.एफ. तंत्रज्ञानामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. तसेच योग्य व्यवस्थापन केल्यास ९० ते १२० दिवसांत प्रतिएकर सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो, असे सविस्तर मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत साळुंखे यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कृषी अधिकारी अमृत भोसले यांनी ऊस उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, तसेच डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर आणि 'रेड जार्वी' या पेरूच्या नव्या जातीच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे यांनी जिल्ह्यात उत्पादित होणारे सर्व सोयाबीन हमीभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात व्यवस्थापन अधिकारी सुरेश खरात यांनी मेळाव्याचा उद्देश आणि बँकेच्या विविध कृषी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास तालुक्यातील प्राथमिक सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी, सोलर कंपन्यांचे प्रतिनिधी, बँकेचे अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि कृषी तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विक्री अधिकारी श्रीमंत कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










