शहरभर अभिनंदनाचे फलक लावून डीवायएसपी सुनील साळुंखे यांचा अभिनव उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यात इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सन २०२५–२६) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाई पोलिसांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या संकल्पनेतून प्रथमच राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमांतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांचे छायाचित्रांसह अभिनंदनाचे फलक वाई शहरातील विविध ठिकाणी झळकविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडूनही वाई पोलिसांचे कौतुक होत आहे.
गुन्हेगारीवर कठोर कारवाई करणारे वाई पोलीस सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या यशालाही तितकेच महत्त्व देत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांच्या मनोधैर्यात भर घालण्याचा आणि इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीसाठी प्रेरित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे श्री. साळुंखे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी पालकांना मुलांच्या शिक्षणाबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक संधी उपलब्ध असून, योग्य मार्गदर्शन, सकारात्मक संगत आणि वेळोवेळी मिळणारे प्रोत्साहन यामुळे विद्यार्थी यशाची नवी शिखरे गाठू शकतात, असे त्यांनी नमूद केले. कुमार व किशोरवयीन मुलांना योग्य दिशा देण्यासाठी पालकांसह समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सण-उत्सवांसह वर्षभर समाजसेवेसाठी तत्पर असलेल्या वाई पोलिसांनी या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा उपक्रम इतर ठिकाणीही राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



